उद्योगांना लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती गगनाला ! file photo
छत्रपती संभाजीनगर

उद्योगांना लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती गगनाला !

गॅस टंचाईसोबतच आता महागाईचा फटका; कच्चा माल २५ ते ५० टक्क्यांनी महागला

पुढारी वृत्तसेवा

The prices of raw materials needed by industries have skyrocketed!

राहुल जांगडे

छत्रपती संभाजीनगर : मध्यपूर्वेत पेटलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईची झळ आता थेट छत्रपती संभाजीनगरातील उद्योगांना बसू लागली आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे ५० कंपन्यांचे उत्पादन ठप्प पडलेले असतानाच, आता कच्च्या मालाच्या झपाट्याने वाढणाऱ्या किमतींमुळे उद्योग अधिकच अडचणीत सापडले आहेत. प्लास्टिक पॅकेजिंग, पावडर कोटिंग, पेट्रोकेमिकल आणि मेटलसह विविध क्षेत्रांसाठी लागणारा कच्चा माल तब्बल २५ ते ५० टक्क्यांनी महागल्याने उद्योजक सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत.

युद्धामुळे उद्भवलेल्या गॅस टंचाईमुळे उद्य ोगनगरीतील ५० पेक्षा जास्त कंपन्यांना त्यांचे उत्पादन बंद करावे लागले आहे. गॅसवर अवलंबून असलेले इतर जवळपास ९५ टक्के उद्योग सध्या आपत्कालीन साठ्यावर सुरू असून, त्यांच्यावरही केव्हाही टाळे ठोकण्याची वेळ येऊ शकते. अशी महाभयंकर परिस्थिती ओढावली असतानाच आता कच्च्या मालाच्या दरवाढीने उद्योजकांची झोप उडवली आहे.

प्लास्टिक पॅकेजिंग, अन्नप्रक्रिया, फार्मास्युटिकल, इंजिनिअरिंग, ऑटो कंपोनंट आणि केमिकल्स या क्षेत्रांतील रॉ मटेरियलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. अनेक कंपन्यांचा कच्चा माल आयातीवर अवलंबून असल्याने आयात प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे उत्पादन खर्च वाढला असून, संपूर्ण सप्लाय चेनवर याचा व्यापक परिणाम होण्याची भीती उद्योजकांनी व्यक्त केली आहे.

प्लास्टिक पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. १०० रुपये किलो असलेला प्लास्टिक दाणा (ग्रॅन्युल्स) आता १५० रुपयांवर पोहोचला आहे. याशिवाय पावडर कोटिंग २५ टक्के, प्लास्टिक पार्ट ४० टक्के, तर अॅल्युमिनियम, पेट्रोकेमिकल, फेरस आणि नॉन-फेरस मेटलच्या किमती ३० ते ५० टक्क्यांनी वाढल्याचे उद्योजकांनी सांगितले.

युनिट बंद करण्याची वेळ कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. त्यामुळे नवीन ऑर्डर्स वाढीव दराने मिळवण्यात अडचणी येत आहेत. गॅस टंचाईमुळे आधीच उद्योग संकटात आहेत, आता कच्चा माल महागल्याने अनेक युनिट्स कायमची बंद होतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
राजेंद्र चौधरी, उद्योजक.
उत्पादित वस्तू महागणार लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती ३० ते ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. उद्योजक गॅस टंचाई आणि महागाई अशा दुहेरी कात्रीत सापडले आहेत. कच्चा माल महाग मिळत असल्याने साहजिकच उत्पादित वस्तूंच्या किमतीही वाढणार आहेत.
अर्जुन गायकवाड, अध्यक्ष, मसिआ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT