The 'One Ward, One Garden' concept will now be implemented in the city
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वाढत्या नागरी विस्ताराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोकळ्या व हिरव्या जागा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून एक प्रभाग-एक उद्यान ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली जाणार आहे. सुमारे ९ कोटी ७० लाख रुपयांच्या निधीतून प्रत्येक प्रभागात आधुनिक सोयींनी युक्त उद्याने उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून, शहराच्या पर्यावरणीय समतोलाला बळकटी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
शहरातील प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र उद्यान विकसित करण्यासाठी महापालिकेकडून एक प्रभाग एक उद्यान ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी २ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नागरिकांना विरंगुळा, व्यायाम तसेच आरोग्यवर्धक उपक्रमांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे.
काँक्रीटच्या वाढत्या जाळ्यात हरित जागांचा अभाव जाणवत असताना हा उपक्रम नागरिकांसाठी दिलासा ठरणार आहे. तसेच शहरातील सिद्धार्थ उद्यानाचा स्मार्ट ग्रीन पार्क म्हणून कायापालट करण्यात येणार असून, त्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. यात आधुनिक सुविधा, आकर्षक हरित रचना आणि पर्यावरण-पूरक उपाययोजना राबवण्यात येणार आहे.
तर शहराला अधिक पर्यावरणस्-नेही बनविण्याच्या दृष्टीने कार्बन न्यूट्रल पार्क, प्लास्टिकमुक्त उद्याने आणि जैवविविधता संवर्धनासाठी विशेष क्षेत्रे विकसित करण्याचा आर- ाखडा तयार करण्यात आला आहे. या उपक्रमांमुळे शहराचा पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत होणार असून, नागरिकांना स्वच्छ व निरोगी वातावरणाचा लाभ मिळणार आहे. बॉटनिकल गार्डनमध्ये वेलनेस सुविधा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बॉटनिकल गार्डनमध्ये अर्बन वेलनेस हब संकल्पना राबविण्यात येणार आहे. १ कोटी रुपयांच्या निधीतून येथे ओपन जिम, मुलांसाठी खेळण्यासाठी स्वतंत्र क्षेत्र तसेच योग व ध्यानासाठी विशेष जागा विकसित केल्या जाणार आहेत. सुविधांमुळे नागरिकांच्या आरोग्यविषयक उपक्रमांना चालना मिळणार आहे.
वृक्षसंवर्धनासाठी तंत्रज्ञानाचा वापर
शहरातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी वृक्ष प्राधिकरणासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जीआयएस आधारित ट्री मॅपिंग, प्रत्येक वृक्षाला क्यूआर कोडद्वारे नोंदणी तसेच अॅडॉप्ट अट्री उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. याशिवाय २.५० कोटी रुपयांच्या खर्चातून डिजिटल ट्री सेन्ससही राबविण्यात येणार आहे.