October hit : ऑक्टोबर हिटचा चटका कायम; पारा ३६ अंशांवर file photo
छत्रपती संभाजीनगर

October hit : ऑक्टोबर हिटचा चटका कायम; पारा ३६ अंशांवर

परतीच्या पावसाची प्रतीक्षा कायम असतानाच शहरात ऑक्टोबर हिटचा चटका जाणवू लागला आहे.

पुढारी वृत्तसेवा

The October hit continues; mercury at 36 degrees

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: परतीच्या पावसाची प्रतीक्षा कायम असतानाच शहरात ऑक्टोबर हिटचा चटका जाणवू लागला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवसापासून कमाल तापमान ३६ अंशांच्या पुढे नोंदले जात असून, रविवारी (दि. ४) शहराचे कमाल तापमान ३६.०, तर किमान तापमान २०.३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. शुक्रवारी (दि. २) कमाल तापमान ३७.० अंशांवर पोहोचले होते. शनिवारी (दि. ३) ३६.३ अंशांची नोंद झाली. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीपासून असलेला उन्हाचा तडाखा ९ ऑक्टोबरपर्यंत राहाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मान्सूनच्या परतीच्या टप्प्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने वातावरणातील आर्द्रता कमी झाली असून शुष्कता वाढली आहे. आकाश निरभ्र राहणे आणि पाऊस नसल्याने दिवसाच्या तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी नागरिकांना उन्हाच्या असह्य झळा सहन कराव्या लागत आहेत. दरम्यान, सप्टेंबरमध्येही उष्णतेची तीव्रता जाणवली.

३० सप्टेंबर रोजी शहरात ३६.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले होते. सप्टेंबरमधील ३० पैकी २६ दिवस कमाल तापमान ३० अंशांच्या पुढे राहिले. आता ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच तापमानाचा पारा चढल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ४ ते ९ ऑक्टोबरदरम्यान शहराचे तापमान ३६ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

या कालावधीत पावसाचा इशारा नसल्याने उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, यंदा पावसाने मोठा खंड घेतल्याने जमिनीतील आणि वातावरणातील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे परतीचा पाऊस असलेल्या काळातही उष्णतेची लाट जाणवत आहे. हवामान अभ्यासकांच्या मते, १५ ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस होण्याची शक्यता असली तरी त्याचा जोर कमी राहण्याचा अंदाज आहे. शहरासह मराठवाड्यातही दिवसाच्या तापमानात वाढ होण्याचे संकेत आहेत.

तापमानाचा चढता पारा

सप्टेंबरमध्ये ३० पैकी २६ दिवस कमाल तापमान ३० अंशांच्या पुढे राहिले. ३० सप्टेंबरला ३६.९ अंशांची नोंद झाली. ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशी ३६.५, दुसऱ्या दिवशी ३७.० आणि तिसऱ्या दिवशी ३६.३ अंश तापमान नोंदले गेले. रविवारी कमाल ३६.०, तर किमान २०.३ अंश तापमान होते. त्यामुळे ऑक्टोबरच्या प्रारंभीच उष्णतेचा चटका कायम असल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT