The married woman was abused for a year and a half by her husband's friend
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
विवाहितेशी जवळीक साधत तिच्यावर वारंवार जबरदस्ती अत्याचार करून मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणात पाचोड पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. अमोल विजय कुलट (१९, रा. दाभरुळ, ता. पैठण) असे आरोपीचे नाव असून, त्याला शुक्रवारपर्यंत (दि. २३) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.डी. गडवे यांनी दिले.
प्रकरणात २७ वर्षीय पीडित विवाहितेने फिर्याद दिली. त्यानुसार, आरोपी अमोल कुलट हा फिर्यादीच्या पतीचा लहानपणापासूनचा मित्र असल्याने त्याचे घरात येणे-जाणे होते. याच ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने मागील दीड वर्षांपासून पीडितेशी जवळीक निर्माण केली. जानेवारी २०२५ मध्ये आरोपीने बदनामीची धमकी देत पहिल्यांदा पीडितेच्या घरात बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर वारंवार धमक्या देऊन अत्याचार सुरू ठेवले. १८ जानेवारी रोजी रात्री पीडितेचा पती घरी नसताना आरोपीने पीडितेला मारहाण करून जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. तसेच याबाबत कोणाला काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही दिली.
यानंतर २० जानेवारी रोजी आरोपी पुन्हा पीडितेच्या घरात येऊन पीडितेला जातीवाचक शिवीगाळ केली व पीडितेसह तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी दिली. प्रकरणात पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी तपास करून आरोपीला २१ जानेवारी रोजी रात्री बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता सहायक लोकाभियोक्ता राजू पहाडिया यांनी आरोपीचे कपडे जप्त करणे, वैद्यकीय व तांत्रिक तपास, तसेच गुन्ह्यात अन्य कोणी सहभागी आहे का याचा शोध घेण्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.