छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे यांच्यावर झालेले आरोप आणि त्यानंतर त्यांनी मुंबईला सागर बंगल्याकडे कूच करण्याचा दिलेला इशारा यामुळे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आंदोलनाला हिंसक वळण लागले. जमावाने एसटी बस पेटवून दिली. त्यानंतर संपूर्ण तालुक्यात संचारबंदी पुकारण्यात आली. बससेवाही बंद ठेवण्यात आली. इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड येथे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या सोबतच येथील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद ठेवली आहे. तसेच जालना, बीड, संभाजीनगर येथील इंटरनेट सेवा 10 तास बंद ठेवण्यात आली आहे. आंदोलक हिंसक होऊन सरकारी मालमत्तेचे नुकसान करू शकतात. यामुळे या जिल्ह्यातील बससेवाही बंद ठेवण्यात आली आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुढील सूचना मिळेपर्यंत जालना जिल्ह्यातील चारही आगारातील बस फेर्या बंद केल्या आहेत.