The leopard was caught
मुलाला ठार करणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश  Pudhari News Network
छत्रपती संभाजीनगर

भाबंरवाडीत १५ वर्षीय मुलाला ठार करणारा बिबट्या अखेर जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

कन्नड : तालुक्यातील भाबंरवाडी येथील ऋषिकेश विलास राठोड या १५ वर्षीय मुलावर हल्ला करुन त्याला बिबट्याने ठार केले होते. या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या रेस्क्यू पथकाला रविवारी (दि.३०) पहाटे तीन वाजता अखेर यश आले. वनविभागाने उपळा शिवारातील बसराज गरदाल राठोड यांच्या गट क्रमांक २५ मध्ये पिजरा व कँमेरे लावले होते. त्याच शेतातून हा नरमक्षक बिबट्या वनविभागाच्या पिज-यात तब्बल ३६ तासानी कैद झाला.

बिबट्या पकडल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. बिबट्याच्या हल्ल्यात ऋषिकेशचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर वनविभागाने कन्नड, नागद आणि वैजापूर परिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक या अधिकारी कर्मचा-यांना बोलावून घेतले. ५०-५५ अधिकारी, कर्मचारी भाबंरवाडी, तेलवाडी, आंबा,उपळा अंधानेर या परिसरात गस्त घालत होते. शुक्रवारी उपळा शिवारात बसराज गरदाल राठोड यांच्या शेतात ४ कॅमेरे, २ पिजरे लावलेले असताना त्याला चकवा देत या बिबट्याने एका बकरीचा फडशा पाडला होता. त्यामुळे या बिबट्याच्या धास्तीने परिसरातील नागरिकांनी तीन रात्री अक्षरशः जागून काढल्या. मात्र अखेर रविवारी या नरभक्षक बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले.

ऋषिकेशवर हल्ला करणारा हा तोच बिबट्या आहे का? हे सिद्ध करण्यासाठी आम्ही घटनास्थळावरून बिबट्याचे डीएनए नमुने गोळा केले आहेत. हा नमुना हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पोलीस पाठवणार आहेत, असे वनविभागाकडून सांगण्यात आले.

SCROLL FOR NEXT