Paithan News : खोपटात नाही कुणी; फडात बाळं गोजिरवाणी  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Paithan News : खोपटात नाही कुणी; फडात बाळं गोजिरवाणी

ऊसतोड मजुरांच्या लहानग्यांचे हरवतेय बालपण, शिक्षण अन् आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

The issue of lost childhood, education and health of the children of sugarcane workers

मोहन ठाकुर

पैठण : ऊसतोड मुजरांची मुले आपल्या पालकांसमवेत उसाच्या फडातच दिवसभर रेंगाळत आहेत. खोपटावर लक्ष द्यायला कोणी नसल्याने सर्व लवाजम्यांसह ही ऊसतोड कुटुंबे उजडायला शेतावर दाखल होतात अन् काम संपले की सायंकाळी खोपटावर परततात. टोळीतील थोडीशी कळती भावंड न कळत्या बाळांचा सांभाळ करत असल्याचे चित्र पहावयास मिळते. आई-वडिलांच्या कष्टाच्या कामामुळे लहानपणीच प्रौढत्वाचा भार उचलून भावंडांचा सांभाळ करत आहेत. त्यामुळे त्यांचे शिक्षण व आरोग्याचा प्रश्न मात्र ऐरणीवर येत असल्याचे पैठण तालुक्यात आलेल्या ऊसतोड मजुरांकडे बघितल्यावर दिसून येते.

पैठण तालुक्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाल्यामुळे शेतशिवारात ऊसतोडणीची कामे जोमात सुरू आहेत. परजिल्ह्यातील कामगार सहकुटुंब दाखल झाले आहेत. उसाच्या फडात लहान भावंडाला कडेवरून फिरवणारा चिमुरडा असे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळते.

मुक्कामाचे ठिकाण बदलले

ज्या- त्या कारखाना कार्यक्षेत्रात मुक्कामास तसेच ज्या भागात ऊसतोडणीचे काम त्याच भागात खोप घालून मुक्काम ठोकला जातो. उदरनिर्वाहासाठी आल्यामुळे कामावाचून पर्याय नसल्याने परिसरातील ऊसतोडणी पूर्ण झाली की दुसऱ्या ठिकाणी मुक्काम हलवला जातो.कामापुरते संसारोपयोगी साहित्य अन् धान्य, अंथरुण-पांघरून एवढाच काय तो प्रपंच सोबत असतो. कामापुरते संसारोपयोगी साहित्य अन् धान्य, अंथरुण-पांघरून एवढाच काय तो प्रपंच सोबत असतो.

मुलांच्या सुरक्षेची अडचण

ऊसतोड कामगारांची लहान मुलेही काही शाळेत जाणारी तर काही अगदीच लहानगी. या मुलांना खोपटावर ठेवल्यास दिवसभर त्यांच्यावर लक्ष कोण ठेवणार? त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव ऊसतोडणीवर जाताना मुलांनाहीसोबत घेतले जाते. उसाच्या फडातच दिवसभर ही मुले थांबतात. कधी झाडा झुडपाची सावली तर कधी उसाच्याच खोपीत बसतात. ऊसतोडणी व मोळ्या बांधून वाहनात भरणे हे कष्टाचे काम असून लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे कल असतो. त्यामुळे पालक ऊस तोडणी करतात.

निरागस बालपण हिरावले

थोडेसे कळते मूल इतर लहान भावंडांना सांभाळते. कधी कडेवर घेऊन तर कधी पाचटात फिरवून ते त्याच्यावर लक्ष ठेवते. संपूर्ण दिवस उसाच्या फडातच या चिमुरड्यांचे बालपण हरवते. ऊन, वारा, पाऊस या सगळ्याचा सामना करत दिवस ढकलला जातो. कष्टकरी पालकांसाठी ही मुले लहानपणीच मोठी होऊन भावंडांचे पालकत्व स्वीकारतात. मात्र त्यांचे निरागस बालपण हिरावले जात आहे. शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडत असल्याने त्यांच्या शिक्षण वआरोग्याचा प्रश्नदेखील ऐरणीवर येत आहे. शासनाकडून मुलांसाठी शिक्षण व आरोग्याबाबत उपाययोजना राबवल्या जात असल्या तरी त्यास अज्ञान अन्य परिस्थितीमुळे पालकांकडून म्हणावासा प्रतिसाद मिळत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT