The illegal businesses in the Waluj Mahanagar area have led to an increase in crime
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा :
वाळूज महानगर परिसरातील अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारीने आता टोक गाठले आहे. गुरुवारी (दि.८) बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकात दुचाकीवरून आलेल्या तीन गुंडांनी हातात नंग्या तलवारी नाचवत परिसरात प्रचंड दहशत निर्माण केली. दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
बजाजनगरमधील स्व. मीनाताई ठाकरे मार्केटजवळ गेल्या अनेक दिवसांपासून अवैध बुग्गी जुगार अड्डा सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास एका दुचाकीवरून तिघे जण मोठमोठ्याने आरडाओरड करत या अड्याजवळ पोहोचले. दुचाकीवर मागे बसलेल्या दोघांनी हातात तलवारी उगारत तेथील एका तरुणावर वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या तरुणाने वेळीच पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला.
एवढ्यावरच न थांबता या गुंडांनी आपला मोर्चा लगतच्या वाईन शॉपकडे वळवला. तिथे उभ्या असलेल्या तीन दुचाकींची त्यांनी तलवारीने तोडफोड करून नुकसान केले. तिथून वडगावच्या दिशेला जाताना मोहटादेवी चौकाजवळही त्यांनी तलवारी फिरवत लोकांमध्ये दहशत निर्माण केली. या सर्व घटनांचे सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यातील दृष्ये अंगावर काटा आणणारी आहेत.
पोलिसांचा पाठलाग; गुंड पसार
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या त्रिकुटाचा पाठलाग सुरू केला. पोलिस मागावर असल्याचे लक्षात येताच आरोपींनी वडगाव येथील पाण्याच्या टाकीजवळ त्यांच्याकडील दोन तलवारी फेकून दिल्या आणि दुचाकी (एमएच-२०, एफके-८२७४) सोडून तेथून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळावरून शस्त्रे आणि दुचाकी जप्त केली असून, सीसीटीव्हीच्या आधारे या दहशतखोरांचा शोध सुरू केला आहे.
पुण्याच्या कोयता गैंग प्रमाणे दहशत
पुण्यात कोयता गँगची दहशत राज्यभरात चर्चेत आली होती. त्याचप्रमाणे आता औद्योगिक वसाहत असलेल्या एमआयडीसी वाळूज परिसरात भररस्त्यात नंग्या तलवारी नाचवत गुंडांची दहशत पाहायला मिळत आहे. या भागात अवैध धंदे फोफावले असून, त्यातूनच अशा गुंडगिरीच्या घटना घडत आहेत. शस्त्रे नाचवून लोकांमध्ये भीती पसरवणाऱ्या या प्रवृत्तींना पोलिसांचा लगाम कधी बसणार? असा प्रश्न आता वाळूजमधील जनता विचारत आहे.