The house of a teacher who had gone on a trip was broken into, and cash and jewelry were stolen
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नाताळच्या सुट्यांनिमित्त कुटुंबीयांसह पर्यटनासाठी गुजरात येथे गेलेल्या शिक्षकाचे घर फोडून चोराने रोखसह दागिने लंपास केले. ही घटना २४ ते २८ डिसेंबरदरम्यान राजमाता जिजाऊ पार्क, कांचनवाडी भागात घडली.
या विषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. संजय सदाशिव बनकर (४४, रा. प्लॉट क्र २९, राजमाता जिजाई पार्क, नाथव्हॅली रोड, कांचनवाडी) हे नाताळ सणानिमीत्त शाळेला सुट्ट्या असल्याने २४ डिसेंबर रोजी घराला कुलूप लावून सहकुटुंब ते गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी बघण्यासाठी गेले होते.
त्यांना रविवारी (दि.२८) सकाळी त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या फाळके यांनी फोन करून तुमच्या घरचा दरवाजा उघडा असून, समोरील सीसीटीव्ही तुटलेला असल्याची माहिती दिली. त्यामुळे त्यांनी त्यांच्या लहान भावाला घरी पाठवले. त्यांनी व्हिडिओ कॉलवर पाहणी केल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
चोरट्यांनी घरातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून कपाटातील दीड तोळ्याच्या दोन अंगठ्या, कानातील रिंग, ४० हजार ५०० रुपये रोख, डीव्हीआर असा बाजारभावानुसार अडीच लाखांचा ऐवज चोराने लंपास केला. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार दिगंबर राठोड करत आहे.