The elderly should stay at home; let us decide our future now
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा राजकारण आणि समाजकारणात नव्या पिढीला संधी मिळणे आवश्यक आहे. साठ ते सत्तर वर्षे वय पूर्ण झालेल्या म्हाताऱ्या लोकांनी निवृत्त होऊन तरुणांना नेतृत्व करण्याची संधी द्यावी, असे मत अभिजित दीपके यांनी केले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर दीपके यांनी वरील वक्तव्य केले. आमचे भवितव्य आहे, आम्हाला ठरवू द्या, असेही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अभिजित दीपके हे सोमवारी (दि.६) छत्रपती संभाजीनगरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या दीपके यांचे दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे. या अनुषंगाने तुम्ही अण्णा हजारे यांची भेट घेणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
त्यावर दीपके म्हणाले, "म्हाताऱ्या लोकांनी आता घरी बसावे, भविष्य आमचे आहे. राजकारण असो किंवा समाजकारण, साठ-सत्तर वर्षे झालेल्यांनी आता निवृत्त व्हावे. कुठे आश्रमात बसावे. तरुणांना काय हवे आहे, कोणत्या दिशा आणि धोरणांची गरज आहे, हे त्यांनाच ठरवू द्यावे. कधीपर्यंत म्हातारे लोक आमचे भवितव्य ठरवतील.
आमचा, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. आता विद्यार्थ्यांनीच हा प्रश्न आपल्या हाती घेतला पाहिजे. तरुण पिढीच्या अपेक्षा, विचार आणि बदलत्या काळातील गरजा लक्षात घेऊन नेतृत्वाची धुरा नव्या पिढीकडे सोपविण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.