The Damini Squad prevented a child marriage just before the couple could step onto the wedding dais.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अठरा वर्षे पूर्ण होण्यासाठी अवघे चार महिने बाकी असताना केलेला उतावळेपणा एका अल्पवयीन मुलीच्या आणि तिच्या प्रियकराच्या चांगलाच अंगाशी आला आहे. मुकुंदनगर भागात अक्षदा पडण्याच्या अगदी शेवटच्या क्षणी पोलिस आणि बालविकास समितीने कारवाई करत हा बालविवाह रोखला. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे लग्न मंडपातील वऱ्हाड्यांची चांगलीच धांदल उडाली.
अवघ्या १७ वर्षे ८ महिने वयाची मुलगी आणि २३ वर्षांचा तरुण हे दोघे नातेवाईक असून, त्यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघांचेही कुटुंबीय मजुरी करतात. या मुला-मुलीने लग्नाचा हट्ट धरला होता. पालकांनी मुलगी सज्ञान होईपर्यंत थांबण्याचा सल्ला दिला.
परंतु, लग्नासाठी उतावळे झालेल्या या जोडप्याने थेट घरातून पळून जाण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या पालकांनी अखेर लग्नाची तयारी सुरू केली. शुक्रवारी (दि. १२) मुकुंदनगर येथील एका शाळेजवळील मैदानात (गेट क्रमांक ५६) या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंडप सजला होता, जेवणावळी तयार होत्या आणि शंभराहून अधिक वऱ्हाडी उपस्थित होते.
या बालविवाहाची गुप्त माहिती महिला व बालविकास समितीच्या सदस्या आम्रपाली बोर्डे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला याची कल्पना दिली. माहिती मिळताच उपनिरीक्षक कांचन सचिन मिरधे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार निर्मला निंभोरे, सुनीता नागलोद, कल्पना नागरे आणि सुरेश शंकपाळ यांच्या पथकाने, अंगणवाडी सेविका आरती काळे व रंजना निकाळजे यांच्यासह थेट लग्न मंडप गाठला. पोलिसांची गाडी पाहताच लग्न लावण्याच्या तयारीत असलेल्या वऱ्हाड्यांचे धाबे दणाणले. पोलिसांनी मंडपात धाड टाकताच अंगाला हळद लागलेली ती अल्पवयीन मुलगी आणि नवरदेव लग्नाच्या वेशातच बाजूला जाऊन लपून बसले.
बराच वेळ वधू-वर गायब असल्याने पोलिसांनी शोध सुरू केला. अखेर दीड तासाच्या शोधानंतर दोघेही समोर आले. पोलिसांनी मुलीच्या वयाचा दाखला तपासला असता, ती अल्पवयीन असल्याचे उघड झाले. पालकांनी गरिबी आणि मुलांच्या प्रेमाचे कारण पुढे केले, मात्र कायद्यासमोर या सबबी चालणार नाहीत असे ठणकावून सांगत पोलिसांनी हा विवाह रोखला आणि दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन केले.