Sambhajinagar News : चार वर्षांपासून शहरातील संत तुकाराम नाट्यगृहाचे पडदे बंदच pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : चार वर्षांपासून शहरातील संत तुकाराम नाट्यगृहाचे पडदे बंदच

निविदांचा गुंता : वाढीव दोन कोटींच्या कामांमुळे आणखी ६ महिन्यांचा विलंब

पुढारी वृत्तसेवा

The curtains at the city's Sant Tukaram Theatre have remained closed for four years

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : स्मार्ट सिटी अभियानातून सुरू करण्यात आलेल्या सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहाच्या नूतनीकरण प्रकल्पाला तब्बल चार वर्षांचा कालावधी उलटूनही पूर्णत्व लाभलेले नाही. विविध कामांसाठी स्वतंत्र कंत्राटे देण्यात आल्याने कामांमध्ये समन्वयाचा अभाव निर्माण झाला असून, एका टप्प्यातील विलंबाचा परिणाम संपूर्ण प्रकल्पावर होत आहे. त्यातच अलीकडील पाहणीत सुमारे दोन कोटी रुपयांच्या अतिरिक्त कामांची आवश्यकता समोर आल्याने नाट्यगृह नागरिकांसाठी खुले होण्यास आणखी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

सिडकोच्या एन-५ परिसरातील संत तुकाराम नाट्यगृह हे एकेकाळी शहराच्या सांस्कृतिक उपक्रमांचे प्रमुख केंद्र मानले जात होते, मात्र छतावरील सीलिंगचा काही भाग कोसळल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव नाट्यगृह बंद करण्यात आले. त्यानंतर संत एकनाथ रंगमंदिराच्या धर्तीवर या नाट्यगृहाचे अत्याधुनिक पद्धतीने नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. निधीची उपलब्धता नसल्याने हा प्रकल्प पुढे स्मार्ट सिटी अभियानाकडे वर्ग करण्यात आला.

सुमारे एक हजार प्रेक्षक क्षमतेच्या या नाट्यगृहात फरशी, सीलिंग, अंतर्गत सजावट, रंगकाम, वातानुकूलित यंत्रणा, अग्निसुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही प्रणाली, ध्वनी व्यवस्था, स्टेज उभारणी, लिफ्ट आणि विद्युत कामे अशा विविध घटकांचा समावेश आहे. या प्रत्येक कामासाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. २०२२ मध्ये कार्यारंभआदेश जारी करण्यात आला असला तरी कामांचा वेग अपेक्षेप्रमाणे राहिला नाही. स्मार्ट सिटी अभियानाची मुदत संपल्यानंतर अपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी आता महापालिकेकडे आली आहे. या कामांची नुकतीच पाहणी करण्यात आली. यात विविध कामे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे.

तसेच वातानुकूलित यंत्रणेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने काम अर्धवट सोडल्याने नव्याने निविदा काढण्याची वेळ आली आहे. त्यामुळे एसीची यंत्रणा पूर्ण झाल्याशिवाय अंतर्गत सजावट आणि अन्य तांत्रिक कामे पूर्ण होऊ शकत नसल्याने संपूर्ण प्रकल्पाची गती मंदावली आहे. त्याचबरोबर विद्युतीकरणाच्या कामातही काही तांत्रिक अडचणी समोर आल्याने कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT