The cantonment area reverberated with the resounding beats of dhol and tasha drums
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छावणी गणेश महासंघाच्या वतीने आयोजित ढोल-ताशा वादन स्पर्धेला गणेशभक्त आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध गणेश मंडळांच्या ढोल-ताशा पथकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवत दमदार वादनाचे सादरीकरण केले. ढोल-ताशांच्या गजराने आणि कडकडाटाने संपूर्ण छावणी परिसर दुमदुमून गेला.
गणेशोत्सवानिमित्त छावणी गणेश महासंघाच्या वतीने ढोल ताशा वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेदरम्यान ढोल-ताशांच्या तालावर कलावंतांनी सादर केलेल्या विविध लयी आणि तालांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पथकांमधील जुगलबंदीमुळे कार्यक्रमात चांगलीच रंगत निर्माण झाली. वादनाच्या प्रत्येक ठेक्यावर उपस्थित गणेशभक्तांनी उत्स्फूर्त दाद दिली. नादमय वातावरणामुळे परिसरात गणेशोत्सवाचा उत्साह अधिकच वाढला.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक ढोल-ताशा पथकाच्या कलागुणांचा आणि उत्साहाचा गौरव करण्यात आला. छावणी गणेश महासंघाच्या वतीने सर्व सहभागी पथकांना स्मृतिचिन्ह व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष महादेव जाधव, रखमाजी जाधव, प्रशांत तारगे, चेतन तायडे, निलेश गजरा, निलेश धारकर, संजय धर्मरक्षक यांच्यासह परिसरातील शेकडो गणेशभक्त, नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जयघोष आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्पर्धेची सांगता झाली.