The BJP's mayoral candidate will be decided today
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
महापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमताजवळ पोहचलेल्या भाजपने अखेर सत्ता स्थापनासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. गुरुवारी पक्षाने गट नेतेपदी गोविंद केंद्रे यांच्या नावाची घोषणा केली. त्यासोबतच विभागीय आयुक्तालयात गटाची नोंदणी केली. तर महापालिकेतून महापौर-उपमहापौरपदासाठी दोन नगरसेविकांमार्फत १६ अर्ज घेण्यात आले. आज (दि. ६) अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे पक्षाकडून मुंबईतून उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल, असे संकेत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दिले आहेत. महापालिकेच्या निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांकडून विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणीला सुरुवात झाली आहे.
एमआयएमनंतर गुरुवारी भाजपने विभागीय आयुक्तांकडे गटाची नोंदणी केली. पक्षाकडून गुरुवारी सकाळीच नगरसेवक गोविंद केंद्रे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यांचे नाव जाहीर झाल्यानंतर दुपारी ३ वाजता पक्षाचे सर्व ५७ नगरसेवक शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या नेतृत्त्वात महापालिकेत दाखल झाले होते. त्यानंतर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडे गटाची नोंदणी करण्यात आली.
एकीकडे ही प्रक्रिया सुरू असतानाच दुसरीकडे भाजप शहराध्यक्ष शितोळे यांनी दोन नगरसेविकांना महापालिकेत पाठविले. त्यांच्यामार्फत महापौर, उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज घेण्यात आले. दरम्यान, गटनेते पदाच्या घोषणेनंतर आता सर्वांचेच लक्ष हे महापौर आणि उपमहापौरपदाच्या उमेदवारांच्या नावाकडे लागले आहे. आज महापालिकेत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी घेता येणार आहे. तर सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. आज अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने भाजपकडून या पदासाठी उमेदवाराचे नाव जाहीर होईल, असे संकेत स्थानिक नेत्यांकडून देण्यात आले आहेत.
राजूरकर, औताडे, वानखेडींची लॉबिंग
सध्या महापौरपदासाठी समीर राजूरकर, राजगौरव वानखेडे, विजय औताडे यांच्याकडून वरिष्ठ पातळीपर्यंत जोरदार लॉबिंग सुरू आहे. तर दुसरीकडे अनेक वर्षांपासून पक्षात एकनिष्ठपणे काम करणारे महेश माळवतकर, अनिल मकरिये हे पदांपासून वंचित आहेत. तसेच खुल्या प्रवर्गामुळे शिवाजी दांडगे यांच्या नावाची देखील चर्चा आहे.
सांगळे, सोळुंकेने घेतले अर्ज
महापौर, उपमहापौरपदासाठी भाजपने एक नव्हे तर तब्बल १६ अर्ज घेतले आहेत. गुरुवारी पक्षाच्या आदेशाने प्रभाग २७ च्या नगरसेविका सुनील सोळुंके, प्रभाग १६ च्या नगरसेविका संगीता सांगळे या महापालिकेत गेल्या. त्यांनी नगरसचिव नंदकिशोर भोंबे यांच्याकडून महापौरपदासाठी ८ आणि उपमहापौरपदासाठी ८ असे १६ अर्ज घेतले