The BJP's election campaign was launched in the Sawangi Zilla Parishad constituency
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा सावंगी जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आजिनाथ धामणे यांच्या निवडणूक प्रच ाराचा थाटात शुभारंभ करण्यात आला. यानिमित्त प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पिसादेवी भागातून प्रचारफेरी काढत मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला. विकास आणि विश्वास या बळावर ही निवडणूक लढविण्याचा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
प्रचाराच्या प्रारंभी बोलताना मान्यवरांनी भाजपाने केंद्र व राज्यात राबविलेल्या विकासाभिमुख योजना, पायाभूत सुविधांचा विस्तार, शेतकरी, महिला, युवकांसाठीच्या कल्याणकारी उपक्रमांचा उल्लेख केला. तसेच आ. अनुराधा चव्हाण यांनी भाजपाची विकासात्मक भूमिका प्रत्येक गावातील शेवटच्या घरापर्यंत पोहोचविणे हेच आपले ध्येय असून, सावंगी गटाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आजिनाथ धामणे हे सक्षम नेतृत्व ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
यानंतर काढण्यात आलेल्या प्रचार फेरीदरम्यान उमेदवार आजिनाथ धामणे यांनी नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेतल्या. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण व रोजगाराच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी मतदारांचा प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांचा जोश पाहता प्रचाराला चांगली सुरुवात झाल्याचे चित्र दिसून आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ, बाजार समितीचे सभापती रामबाबा शेळके, सजननाना मते, अप्पा भुमे, विश्वंभर धामणे, गणेश धामणे, दिनेश धामणे, रामा शिंदे, योगेश मालोदे, गणेश साळुंके, भरत जाधव, विजय साळुंके, सचिन शिंदे, सागर तुपे, संतोष राजगुरू, प्रकाश चंद्रटीके, मुकेश उघडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.