छत्रपती संभाजीनगर : एका बाजूला कबुतरखान्यावरून वातावरण तापलेले असताना, दुसरीकडे सोशल मीडिया आणि यूट्यूबवर मात्र 'कबुतर डाळ' आणि 'कबुतर मटार' या नावांनी धुमाकूळ घातला आहे. पण ही 'कबुतर डाळ' म्हणजे नक्की काय? हा प्रश्न खाद्यप्रेमींना पडला आहे.
सध्या सोशल मीडियावर, विशेषतः यूट्यूबवर, 'कबुतर डाळ' किंवा 'कबुतर मटार'च्या चर्चा होत आहेत. ही डाळ शरीरासाठी किती पौष्टिक आहे, याचे फायदे सांगितले जात आहेत. मात्र, गंमत तेव्हा लक्षात येते, जेव्हा या रेसिपीमधील डाळीचे छायाचित्र पाहिले जाते. ही 'कबुतर डाळ' दुसरी तिसरी कोणतीही नसून आपल्या सर्वांच्या स्वयंपाकघरातील अविभाज्य घटक असलेली 'तूर डाळ' आहे. शब्दांच्या किमयेतून गोंधळ हा सर्व गोंधळ इंग्रजीतील 'पिजन पी' (Pigeon Pea) या शब्दामुळे निर्माण झाला आहे. 'Pigeon Pea' हे तूर डाळीचे इंग्रजी नाव आहे. गुगल ट्रान्सलेट किंवा अन्य भाषांतर साधनांवर याचे भाषांतर केल्यास 'कबुतर मटार' किंवा 'कबुतर डाळ' असा शब्दशः अनुवाद समोर येतो. याच चुकीच्या अनुवादाने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
विशेष म्हणजे, जर तुम्ही 'Pigeon Pea' (दोन शब्द) ऐवजी 'Pigeonpea' असे सर्च केले, तर मात्र 'तूर डाळ', 'अरहर डाळ' असे योग्य उत्तर मिळते. इतिहासात 'ध' चा 'मा' झाल्याने काय घडले हे सर्वश्रुत आहे, तसाच काहीसा प्रकार या डिजिटल युगात शब्दांच्या खेळामुळे घडत आहे. तज्ज्ञ म्हणतात, 'कबुतर डाळ' अस्तित्वातच नाही! या संदर्भात आम्ही कृषी तज्ज्ञांशी संपर्क साधला असता, त्यांनीही यामागील सत्य उघड केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील बदनापूर येथील केंद्रातील संशोधक प्रा. दीपक पाटील यांनी असे सांगितले की, "वास्तविक 'कबुतर डाळ' नावाची कोणतीही डाळ अस्तित्वात नाही. हा केवळ 'Pigeon Pea' या इंग्रजी नावाच्या चुकीच्या भाषांतराचा परिणाम आहे. कबुतरांना वाटाणे आणि डाळी खायला आवडतात, यावरून कदाचित तुरीला हे नाव मिळाले असावे. पण याचा अर्थ ती कबुतराची डाळ होत नाही.
ज्येष्ठ तूर संशोधक डॉ. भगवानराव कापसे यांनीही 'कबुतर डाळ' अस्तित्वात नसल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. तुरीचा खरा इतिहास आणि महत्त्व तूर हे पीक मूळचे भारतातील की आफ्रिकेतील, यावर संशोधकांमध्ये मतभेद असले तरी, भारताच्या इतिहासात आणि आहारात तुरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ख्रिस्तपूर्व चारशे वर्षांपूर्वीच्या बौद्ध साहित्यात आणि चरकसंहितेतही तुरीचा उल्लेख आढळतो.
कमी खर्चात सर्वाधिक प्रोटीन देणारे पीक म्हणून तूर डाळ ओळखली जाते. त्यामुळेच भारतीय जेवणात वरण, आमटी किंवा सांबारच्या स्वरूपात तिचा सर्रास वापर होतो. थोडक्यात, शहरात कबुतरांवरून सुरू असलेला वाद आणि सोशल मीडियावर 'कबुतर डाळी'चा ट्रेंड यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. हा केवळ एका भाषिक गमतीचा परिणाम आहे.