Sambhajinagar Crime News : भाडेकरूचा प्रताप ! बनावट खरेदीखत अन् खोट्या सहीने हडपले घर file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime News : भाडेकरूचा प्रताप ! बनावट खरेदीखत अन् खोट्या सहीने हडपले घर

मनपा टॅक्स, वीज मीटरही केले स्वतःच्या नावे; गारखेडा परिसरातील प्रकार

पुढारी वृत्तसेवा

Tenant's Audacity! House Grabbed Using Forged Sale Deed and Fake Signature

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : किरायाने राहायला आलेल्या भाडेकरूने घरमालकाचीच बनावट सही करून घराचे बोगस खरेदीखत आणि नोटरी बॉण्ड तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढेच नव्हे तर, या बनावट कागदपत्रांच्या आधारे महापालिकेचा टॅक्स आणि महावितरणचे वीज मीटरही स्वतःच्या नावे करून घेत घर लाटण्याचा डाव रचण्यात आला. गारखेडा परिसरातील धर्तीधन सोसायटीत घडलेल्या या प्रकाराबाबत जवाहरनगर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी कल्पना बप्पी दास हिच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मनोज चंपालाल बोरा (५२, रा. सिडको एन-२, कामगार चौक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बोरा यांचे गारखेडा परिसरातील धर्तीधन सोसायटीत घर (क्र. १४) आहे. त्यांनी हे घर २०१२ मध्ये खरेदी केले होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी एका भाच्याच्या मध्यस्थीने हे घर बप्पी दास याला दरमहा ६ हजार रुपये भाड्याने दिले होते. तिथे बप्पी दास त्याची पत्नी कल्पनासोबत राहत होता. २०२२ मध्ये बप्पी दास याच्या निधनानंतरही त्याचा परिवार त्याच घरात राहत होता, मात्र तेव्हापासून त्यांनी घराचे भाडे देणे बंद केले होते.

आरोपी कल्पना दास हिने २९ जून २०२५ रोजीचा स्टॅम्प पेपर वापरून घराचे एक बनावट खरेदीखत तयार केले. त्यावर घरमालक मनोज बोरा यांची हुबेहूब खोटी सही केली.

या बोगस नोटरी बॉण्डचा खरा कागदपत्र म्हणून वापर करत, तिने महापालिकेत अर्ज दिला आणि घराचा मनपा टॅक्स (मालमत्ता कर) थेट स्वतःच्या नावे लावून घेतला. मनपा पाठोपाठ महावितरण कार्यालयातही हीच बनावट कागदपत्रे सादर करून घराचे इलेक्ट्रिक मीटर स्वतःच्या नावे हस्तांतरित करून घेतले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मनोज बोरा यांनी जवाहरनगर पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार वानखेडे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT