प्रातिनिधिक छायाचित्र file photo
छत्रपती संभाजीनगर

शेताच्या बांधावर खेळणारा १० वर्षीय मुलगा बिबट्याच्या हल्ल्यात ठार; परिसर धास्तावला

Chh. Sambhajinagar News | वैजापूर कविटखेडा शिवारातील घटना

पुढारी वृत्तसेवा

शिऊर : पुढारी वृत्तसेवा : वैजापूर तालुक्यातील कविटखेडा येथील शेताच्या बांधावर खेळत असलेल्या दहा वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.१५) दुपारी १२ च्या दरम्यान घडली. महेश सिद्धार्थ आखाडे असे मृत मुलाचे नाव आहे. महिन्याभरातील ही दुसरी घटना असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेमुळे वनविभागा विरोधात तीव्र रोष व्यक्त होत आहे. (Chh. Sambhajinagar News)

याबाबत अधिक माहिती अशी की, कवीटखेडा परिसरातील गोरख काशिनाथ चव्हाण यांच्या गट नंबर १३३ शेतामध्ये मध्यप्रदेशमधील परप्रांतीय कामगार कापूस वेचण्याचे काम करत होते. कामगाराचा मुलगा शेताच्या बांधावर खेळत होता. यावेळी शेजारील ज्वारीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुलावर हल्ला चढवत शेतात फरफटत नेले. मुलाच्या ओरडण्याच्या व रडण्याच्या आवाजाने कामगार मुलाला वाचविण्यासाठी धावले. शेजारी शेतात ट्रॅक्टरचे काम सुरू होते. चालकाने तत्काळ ज्वारीच्या शेतात ट्रॅक्टर घातला. परंतु, बिबट्याने पळ काढला. मात्र, तोपर्यंत गंभीर जखमी झालेल्या मुलाचा जागीच मृत्यू झाला.

महिन्याभर लहान मुलांवर बिबट्याने दुसऱ्यांदा हल्ला केला आहे. काही दिवसांपूर्वी तलवाडा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलीचा मृत्यू झाला होता. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग अपयशी ठरत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT