घाटी रुग्णालयात महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar teacher death : जनगणनेच्या ड्यूटीवरील शिक्षकाचा उष्माघाताने मृत्यू

शिक्षक संघटना आक्रमक, मनपाच्या लेखी आश्वासनानंतर मृतदेह ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जनगणनेच्या कर्तव्यावरील शिक्षकांचा शनिवारी (दि. ३०) उष्माघाताने मृत्यू झाला. दिवसभर रणरणत्या उन्हाळात ड्यूटी करून घरी परत-लेले शिक्षक किशोर नामदेव समुद्रे हे पाणी पिताच जमिनीवर कोसळले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वच शिक्षक संघटना आक्रमक झाल्या. रविवारी सकाळी कुटुंबीयांसह शिक्षक संघटनांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. अखेर महापालिकेने दुपारी शिक्षक संघटनांच्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर समुद्रे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

उस्मानपुरा भागातील भागीरथी विद्यालयातील शिक्षक किशोर नामदेव समुद्रे यांना सातारा परिसरातील (झोन क्र. १०) मधील जनगणनेची जबाबदारी सोपवली होती. शनिवारी दुपारी दीड ते दोन वाजेदरम्यान जनगण नेचे काम करून ते घरी परतले. घरी आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने खाली कोसळले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

रविवारी सकाळपासून शिक्षक संघटनांनी किशोर समुद्रे यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची विशेष आर्थिक मदत, कुटुंबातील पात्र व्यक्तीला अनुकंपा तत्वावर शासकीय किंवा महापालिका सेवेत नोकरी द्यावी, कुटुंबाच्या पुनर्वसानासाठी आवश्यक असलेल्या सर्व शासकीय योजना, शैक्षणिक सवलती, विमा लाभ व आर्थिक मदत तात्काळ मंजूर करावी, घटनेची उच्चस्तरीय चौकशी करीत अहवाल सार्वजनिक करावा आणि जनगणना,नियुक्त निवडणूक, सर्वेक्षण आदी शासकीय कामांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी उष्माघात प्रतिबंधक उपाययोजनासह विमा संरक्षण द्यावे, अशा मागण्या केल्या होत्या.

या मागण्यांवर लेखी हमी दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका या शिक्षकांनी घेतली. शेवटी मनपाच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांनी वरिष्ठांच्या परवानगीने शिक्षक संघटनांना मागण्याचा सकारात्मक पाठपुरावा करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला.

त्यांच्यावर भीमनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. समुद्रे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ-बहीण, असा परिवार आहे. पीरबाजार येथील भागीरथ प्राथमिक शाळेत किशोर समुद्रे हे गेल्या २५ वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत होते.

मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे

शिक्षक किशोर समुद्रे (४३) यांचा शनिवारी (दि. ३०) अचानक मृत्यू झाला. त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान, रविवारी घाटीतील विभागप्रमुख डॉ. राधेय खेत्रे यांच्यासह पाच जणांच्या टीमकडून शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार त्या शिक्षकाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे (मायोकार्डिअल इन्फार्शन) झाला असून, त्यामागे हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा आधीपासून असलेला आजार (अंडरलायिंग कोरोनरी आर्टरी डिसीज) कारणीभूत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT