'माझ्याशी बोल, नाहीतर आई-वडिलांना मारून टाकीन'; मुलीला धमकी  File Photo
छत्रपती संभाजीनगर

'माझ्याशी बोल, नाहीतर आई-वडिलांना मारून टाकीन'; मुलीला धमकी

इंस्टाग्रामवरील मित्राविरुद्ध मुकुंदवाडी पोलिसात 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

'Talk to me or I will kill your parents'; Threatened the girl

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून, तिला आई-वडील आणि बहिणीला जीवे मारण्याची धमकी देत तिचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घरात आई-वडील नसताना आरोपीने हे कृत्य केले असून, घाबरलेल्या मुलीला त्याने बीबी का मकबरा परिसरात नेऊन फिरवले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध 'पोक्सो' आणि अपहरणासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अविनाश सुनील राठोड असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांचे पती हे दोघेही खाजगी नोकरी करतात. बुधवारी (दि. २ सप्टेंबर) दुपारी दीड वाजेच्या सुमारास ते दोघेही त्यांच्या दोन मुलींना घरात सोडून ड्युटीवर गेले होते. जाताना घाईत पतीला चावी न सापडल्याने घराला कुलूप लावण्याऐवजी केवळ बाहेरून कडी लावण्यात आली होती. नंतर पतीने घरी येऊन पाहिले असता, लहान मुलगी घरात एकटीच जोरजोरात रडत होती आणि मोठी (पीडित) मुलगी घरात नव्हती. त्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही.

सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पीडित मुलगी रडतच घरी परतली. आई-वडिलांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घडलेला भयंकर प्रकार सांगितला. आरोपी अविनाश राठोड याच्यासोबत तिची दोन वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. तो तिला सतत भेटण्यासाठी दबाव टाकत होता, मात्र मुलगी नेहमी नकार देत होती. त्यामुळे तो तिचा पाठलाग करत असे आणि त्यातूनच त्याने तिचे घर शोधून काढले होते.

बुधवारी दुपारी अडीच वाजता घरात कुणीही नसल्याचे पाहून तो तिच्या घराजवळ आला आणि त्याने तिला बाहेर बोलावले. "माझ्याशी बोल, नाहीतर तुझ्या आई-वडिलांना आणि बहिणीला जीवे मारून टाकीन," अशी गंभीर धमकी त्याने मुलीला दिली.

धमकावून मकबरा परिसरात नेले

आई-वडिलांना मारण्याच्या धमकीमुळे अल्पवयीन मुलगी प्रचंड घाबरली. त्यानंतर आरोपीने तिला जबरदस्तीने स्वतः सोबत बीबी का मकबरा परिसरात नेले. तिथे तिला फिरवून सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पुन्हा घराजवळ आणून सोडले. घडलेल्या प्रसंगामुळे मुलगी अत्यंत दहशतीखाली होती. मुलीने सर्व हकिकत सांगितल्यानंतर पालकांनी तत्काळ मुकुंदवाडी ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक अंकुश वाकळे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT