Voter List Objections File Photo
छत्रपती संभाजीनगर

Municipal Voter Lists : मतदार याद्यांत हेराफेरी करणाऱ्यांवर कारवाई करा !

शिवसेना उबाठा गटाची मागणी : मनपा प्रशासकांना निवेदन सादर

पुढारी वृत्तसेवा

Take action against those who tamper with voter lists! Demand of Shiv Sena Uddhav Thackeray group

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये उघड झालेल्या अतिगंभीर अनियमिततेविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून, मतदारांचे हक्क अबाधित राहावेत यासाठी तातडीने दुरुस्ती केली जावी, यासह यांद्यामध्ये हेराफेरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा मागण्यांचे निवेदन बुधवारी (दि. २६) ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिष्टमंडळाने मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांना भेटून सादर केले.

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. यात शहरातील एका प्रभागातील हजारो मतदारांचे नावे कोणतीही कारणे न देता इतर प्रभागांत स्थलांतरित करणे, काहींची नावे एकाहून अधिक प्रभागांत दिसणे, पत्ते व प्रभाग क्रमांक चुकीचे असणे, तर काहींची नावे पूर्णपणे गायब होणे, अशा गंभीर प्रकरणांमुळे मतदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

बीएलओंनी स्थळपाहणी न करता कार्यालयात बसूनच यादी तयार केल्याच्या आरोपावरही शिष्टमंडळाने बुधवारी (दि. २६) प्रशासकांचे लक्ष वेधले. यातील निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार मृत आणि दुबार मतदारांचे नाव वगळणे अपेक्षित असतानाही प्रारूप यादीत मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचे निदर्शनास आणत, सर्व प्रभागांची तातडीने पुनर्तपासणी, चुकीने स्थलांतरित मतदारांना मूळ प्रभागात समाविष्ट करणे, विशेष मदत केंद्रे सुरू करणे आणि सुधारित यादी पुन्हा प्रसिद्ध करण्याची मागणी ठाकरे गटाने केली.

तसेच मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, महानगरप्रमुख राजू वैद्य, उपजिल्हाप्रमुख गिरीजाराम हाळनोर, आनंद तांदूळवाडीकर, राजू इंगळे, विठ्ठल बदर, बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, आशा दातार, मीना फसाटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थित होती.

प्रशासकांचे आश्वासन

ठाकरे गटाकडून निवेदन स्वीकारताना मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले की, प्राप्त आक्षेपांवर सुनावणी घेतली जाईल, आवश्यकतेनुसार स्थळपाहणी करून अनावधानाने झालेल्या चुकांची तातडीने दुरुस्ती केली जाईल. तसेच जाणूनबुजून चूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.

चूक झाली कुणाकडून ? दानवेंचा सवाल

माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रशासनावर थेट टीकास्त्र सोडत मतदार याद्यांमध्ये इतक्या चुका कशा ? प्रभाग विभाजनासाठी नियुक्त तेच अधिकारी यादी तयार करत होते. मग चूक झाली कुणाकडून ? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.

दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

याद्यांतील घोळामागे हेतुपुरस्सर बदलांचे संकेत दिसत असल्याचा ठपका ठेवत माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, एका प्रभागातील तीन ते सहा हजार मतदारांचे नावे दुसऱ्या प्रभागात कशी हलवण्यात आली? ही चूक नाही तर धाडस आहे. कुणाच्या फायद्यासाठी हा प्रकार झाला? मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणारा एकही प्रकार सहन केला जाणार नाही. मतदार याद्यांतील चुकांस जबाबदार कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT