कळमनुरी ( हिंगोली ) : तालुक्यातील ढोलक्याचीवाडी शिवारातील शेतात आढळून आलेल्या मगरीची ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील तलावात बुधवारी (दि.24) पहाटे सुटका करण्यात आली. मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडल्यानंतर वन विभागाच्या पथकाने सुटकेचा निःश्वास सोडला.
कळमनुरी तालुक्यातील ढोलक्याचीवाडी शिवारात आनंदराव फटींग यांचे शेत आहे. त्यांच्या शेतापासून काही अंतरावरच इसापूर धरण असून एक छोटा कालवा देखील आहे. या पाण्याचा ऊसासाठी वापर केला जातो. मागील काही दिवसांपासून त्यांच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरू आहे. कामगार ऊस तोडणी करीत असताना त्यांना उसाच्या फडात मोठी हालचाल जाणवली. कामगारांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता तेथे जिवंत मगर आढळून आली. गावकरी व वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन मगर ताब्यात घेतली. सदर मगरीला ईसापूर धरणात सोडू नये अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती. त्यानंतर बुधवारी (दि.24) रोजी सकाळच्या सुमारास मगरीची पाण्यामध्ये सुटका केली. मगरीचा पिंजरा उघडताच पाण्याचा प्रवाह पाहून मगर सुखरुपपणे पाण्यात गेली. त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे यांनी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून मार्गदर्शन मागविले होते. त्यावरून मगरीची तपासणी करून तिला ताडोबाच्या बफर क्षेत्रात नैसर्गिक अधिवासात सोडण्यास परवानगी दिली होती. त्यावरून वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, वनपाल शिवरामकृष्ण चव्हाण, वनपाल सारंग शिंदे, शिवाजी काळे, सुधाकर कहऱ्हाळे, संग्राम भालेराव, शेख सिद्दीक यांच्या पथकाने रातोरात ताडोबा प्रकल्प गाठला.
बुधवारी सकाळच्या सुमारास मगरीची पाण्यामध्ये सुटका केली. मगरीचा पिंजरा उघडताच पाण्याचा प्रवाह पाहून मगर सुखरुपपणे पाण्यात गेली. त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.