Swindled of ₹41 lakh with the promise of a Talathi job
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवाः शासकीय नोकरीचे स्वप्न दाखवून सुशिक्षित बेरोजगारांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका महाठगाचा प्रताप शहरात उघडकीस आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार करून, 'तलाठी' (ग्राम महसूल अधिकारी) पदाचे बोगस नियुक्ती आदेश देत दोघांकडून तब्बल ४१ लाख ५० हजार रुपये उकळण्यात आले आहेत. फसवणुकीची हद्द म्हणजे, आरोपींनी उमेदवारांना चक्क बनावट ओळखपत्रे, टॅब देऊन त्यांचे बनावट प्रशिक्षणही (ट्रेनिंग) पूर्ण केले. हा प्रकार २४ फेब्रुवारी ते १३ ऑगस्ट २०२६ दरम्यान जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयाच्या आवारात घडला.
या प्रकरणी बाळासाहेब हरबक आणि त्याच्या एका साथीदारावर सिटी चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिनाथ ज्ञानेश्वर वरकड (रा. मावसाळा, ता. खुलताबाद) आणि अक्षय साईनाथ गायकवाड (रा. एन-२, सिडको) यांनी यासंदर्भात तक्रार दिली होती.
त्यानुसार, अजिनाथ यांच्या पत्नी अश्विनी तुपे आणि अक्षय यांचा भाऊ स्वप्नील गायकवाड यांना तलाठी पदावर नियुक्ती झाल्याचे भासवण्यात आले. १० ऑगस्ट २०२६ रोजी त्यांना rdcchsngr@gmail.com या बनावट ई-मेलवरून बोगस नियुक्ती आदेश पाठवण्यात आले. मात्र, १३ ऑगस्ट रोजी जेव्हा या उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन पडताळणी केली, तेव्हा पायाखालची वाळूच सरकली. हे आदेश पूर्णपणे बनावट असल्याचे तिथे उघड झाले. त्यानंतर महसूल फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला-
अशी उकळली ४१ लाखांची रोकड
तलाठी पदाच्या या बनावट नियुक्तीसाठी अजिनाथ यांच्याकडून १३ लाख ५० हजार रुपये, तर अक्षय यांच्याकडून तब्बल २८ लाख रुपये उकळण्यात आले. ही रक्कम आरटीजीएस, फोन-पे आणि रोख स्वरूपात घेण्यात आली. दोन्ही व्यवहारांतून आरोपींनी ४१ लाख ५० हजार रुपयांचा डल्ला मारला आहे.
पुणे, कोल्हापूरहून बोलावले 'प्रशिक्षक'
उमेदवारांचा विश्वास बसावा यासाठी फसवणुकीचा मोठा फार्स रचण्यात आला होता. नियुक्तीपूर्वी २४ फेब्रुवारीपासून सुभेदारी विश्रामगृह, तहसील कार्यालय व पंचायत समितीत आठवड्यातून तीन दिवस त्यांना चक्क प्रशिक्षण देण्यात आले. 'पुणे व कोल्हापूरहून प्रशिक्षक येत आहेत', असे : त्यांना सांगण्यात आले. प्रशिक्षणार्थीना तलाठी म्हणून बनावट ओळखपत्रे आणि टॅबही देण्यात आले. शिवाय, महसूलच्या संगणकीय कामकाजासाठी तहसीलदार शिवानंद बिडवे यांच्या बनावट स्वाक्षरीची पत्रेही त्यांच्या हाती सोपवण्यात आली होती
अधिकारी-तहसीलदारांच्या स्वाक्षऱ्याही बनावट !
या प्रकरणातील कागदपत्रांची कार्यालयीन अभिलेखांशी पडताळणी केली असता, धक्कादायक माहिती समोर आली. आरोपींनी दिलेले नियुक्ती आदेश, त्यावर मारलेला जिल्हाधिकारी कार्यालयाचा शिक्का, तसेच निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते आणि तहसीलदार शिवानंद बिडवे यांच्या स्वाक्षऱ्याही पूर्णपणे बनावट असल्याचे निष्पन्न झाले.