SWEEP cell's awareness campaign for voting
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा :
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शंभर टक्के मतदान घडवून आणण्याच्या उद्देशाने स्वीप कक्ष गंगापूरच्या वतीने गुरुवारी (दि. २९) शहर व ग्रामीण भागात व्यापक मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार तसेच गंगापूर निवडणूक निर्णय अधिकारी विजय राऊत, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नवनाथ वगवाड आणि स्वीप कक्षाचे नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी अरविंद कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली बसस्थानक परिसरासह ग्रामीण भागात मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
या उपक्रमात स्वीप कक्षाचे अनिल सकदेव, कडुवा हारदे, जनार्दन राऊत, सचिन वालतुरे, कल्याण राऊत, सागर घोनशेट्टे, प्रदीप जाधव, श्रीमती ठोंबरे, दादा गावंडे, सदा बागडे व श्रीमती महाले यांनी पथनाट्याच्या माध्यमातून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच स्वीप कक्षाचे सदस्य दत्ता अडेप यांनी रांगोळीच्या माध्यमातून आकर्षक पद्धतीने मतदार जनजागृती करत नागरिकांना मतदानासाठी प्रेरित केले.
भवन येथे मतदार जनजागृती कार्यक्रम
सिल्लोड : मतदान हे अधिकारासोबतच संविधानाने दिलेले पवित्र कर्तव्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित जनजागृती कार्यक्रमात करण्यात आले.
तहसील कार्यालय अंतर्गत स्वीप पथकाच्या वतीने भवन येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. नीलेश अपार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय देवराये, बीडीओ रत्नाकर पगार, मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, गटशिक्षणाधिकारी रमेश ठाकूर, नोडल अधिकारी राजीव फुसे व सहा. नोडल अधिकारी किशोर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मतदार जनजागृतीचा उद्देश स्पष्ट करत नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी राजेंद्र सपकाळ व गजेंद्र आवारे यांनी मार्गदर्शन करत निर्भय व जबाबदारीने मतदान करण्याचे आवाहन केले. लोकशाही बळकट करण्यासाठी आम्ही निश्चयाने मतदान करू अशी सामूहिक शपथ घेऊन उपस्थितांनी राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव व्यक्त केली.
मतदानाच्या दिवशी उपलब्ध असणाऱ्या सोयी-सुविधांबाबत राजू आठवले, शालिनी काळे व अशोक काळे यांनी माहिती देत मतदारांच्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जितेंद्र पानपाटील, फिरोज सय्यद व नामदेव गाडेकर यांचे सहकार्य लाभले.