खदाणीच्या पाण्यात पोहत जाऊन विद्युत तार जोडली file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : खदाणीच्या पाण्यात पोहत जाऊन विद्युत तार जोडली

चितेगाव परिसरात वीज कर्मचाऱ्यांची धाडसी कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

Swam through the quarry water to connect the electrical wire

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

चितेगाव परिसरात वादळी वाऱ्यामुळे महावितरणच्या यंत्रणेत विविध बिघाड झाले. औद्योगिक ग्राहकांना वीज पुरवठा करणाऱ्या ११ केव्ही इंडस्ट्रियल वाहिनीची तार तुटून खदाणीच्या पाण्यात पडली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विविध मार्गांनी तार जोडण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी झाला नाही. प्रयत्नानंतर दोन धाडसी तंत्रज्ञांनी जोखीम पत्कारत पाण्यात पोहत जाऊन तारा जोडण्याचे काम केले.

चितेगाव परिसरात शुक्रवारी (दि.३) दुपारी वादळी वाऱ्यामुळे महावितरणच्या विद्युत यंत्रणेत ठिकठिकाणी बिघाड झाले. परिसरातील १० उच्चदाब ग्राहक व ५६ लघुदाब औद्योगिक ग्राहकांना वीज पुरवठा करणाऱ्या ११ केव्ही इंडस्ट्रियल वाहिनीत दुपारी बिघाड झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता रमानगरमागील खदाणीत तार तुटून पडल्याचे आढळले.

तेवढा भाग वगळून ५५ ग्राहकांचा वीज पुरवठा तातडीने सुरू करण्यात आला. मात्र त्याचवेळी परिसरातील ३३ केव्ही वाहिन्यांतही बिघाड झाला होता. त्यामुळे त्या दुरुस्तीस प्राधान्य देण्यात आले. शनिवारी (दि.४) सकाळपासूनच उर्वरित ११ औद्योगिक ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी कामाचे नियोजन करण्यात आले. तराफा आणून तसेच थर्माकोलच्या साह्याने खदाणीच्या पाण्यात उतरून तार जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो अयशस्वी ठरला.

पाण्यात उतरण्याचा धाडसी निर्णय

शेवटी महावितरणचे तंत्रज्ञ योगेश जाधव व शंकर करताडे यांनी पाण्यात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांनी पाण्यात पोहत जाऊन तुटलेली तार बाजूला काढली. तसेच एका फेजची नवीन तार पाण्यात नेऊन ती जोडण्याचे काम केले. त्यांना वरिष्ठ तंत्रज्ञ दीपक वाघमारे, गोरख ठोंबरे, अशोक सुरसे यांनी सहकार्य केले. सहायक अभियंता अनिल सैवर यांच्या निगर-ाणीखाली हे काम केल्यानंतर सायंकाळी ७वाजेच्या सुमारास ११ औद्योगिक ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. या धाडसी कामगिरीबद्दल मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT