Surpassing 62 airports, Sambhajinagar emerges at the top
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : प्रवाशांना दर्जेदार सेवा आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत छत्रपती संभाजीनगर विमानतळाने देशात नवा मानदंड निर्माण केला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अखत्यारितील देशभरातील ६२ विमानतळांमध्ये जुलै ते डिसेंबर २०२५ या कालावधीत घेण्यात आलेल्या कस्टमर सॅटिस्फॅक्शन सर्व्हे राऊंड २ मध्ये संभाजीनगर विमानतळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रवाशांच्या समाधानाला केंद्रस्थानी ठेवून राबविण्यात आलेल्या विविध सुविधांमुळे ही उल्लेखनीय कामगिरी शक्य झाल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले.
भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे १५ जून रोजी यात्री सुविधा दिन साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त शनिवारी (दि. १३) आयोजित पत्रकार परिषदेत विमानतळ संचालक शरद येवले यांनी विमानतळावरील सुविधांची माहिती दिली. यात प्रवाशांचा विमानाच्या प्रतीक्षेतील वेळ अधिक रंजक आणि उपयुक्त व्हावा यासाठी विमानतळावर कॅरम बोर्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तसेच वाचनप्रेमींसाठी सुसज्ज ग्रंथालय उभारण्यात आले असून प्रवासापूर्वी किंवा प्रतीक्षेदरम्यान पुस्तकांच्या सहवासाचा आनंद घेता येत आहे. तसेच मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांचा विचार करून विमानतळावर स्वतंत्र किड्स झोन विकसित करण्यात आला आहे. येथे मुलांसाठी विविध खेळणी आणि मनोरंजन साहित्य उपलब्ध आहे. यासह लहान बालकांसह प्रवास करणाऱ्या महिलांसाठी स्वतंत्र चाईल्ड केअर रूमची सुविधाही देण्यात आली आहे. तर प्रवाशांना तीन तासांपर्यंत मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच व्यावसायिक आणि ऑनलाइन काम करणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र वर्कस्टेशन उभारण्यात आले असून प्रवासादरम्यानही कामकाज सुरळीतपणे करता येते.
पर्यटननगरीची विमानतळावरच ओळख
संभाजीनगरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची झलक प्रवाशांना विमानतळावरच पहायला मिळावी यासाठी विविध भागांत जागतिक वारसा स्थळे आणि पर्यटनस्थळांची आकर्षक छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. याशिवाय खाद्यपदार्थ व इतर सेवांसाठी १० सुविधा काऊंटर तसेच अत्याधुनिक व्हीआयपी कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे.
विमानतळाला प्रवाशांची पहिली पसंती
स्वच्छता, सुविधा, सेवा गुणवत्ता, कर्मचाऱ्यांचे सहकार्य आणि प्रवासी अनुभव या विविध निकषांवर झालेल्या मूल्यांकनात संभाजीनगर विमानतळाने सर्वोच्च स्थान मिळविले. देशातील ६२ विमानतळांमध्ये अव्वल ठरत विमानतळाने केवळ शहराचाच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्याचा गौरव वाढविला आहे.