ज्ञानराधा बँक घोटाळ्याचा प्रमुख कुटेसह संचालक पाटोदाकरला अटक 
छत्रपती संभाजीनगर

ज्ञानराधा बँक घोटाळा प्रकरण : संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटेसह संचालक पाटोदाकरला अटक

पुढारी वृत्तसेवा
चंद्रकांत अंबिलवादे

पैठण : बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह पैठण येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक घोटाळा प्रकरणातील प्रमुख सूत्रधार ज्ञानराधा व तिरूमला उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश ज्ञानोबा कुटे याच्यासह संचालक आशिष पद्माकर पाटोदेकर याला छत्रपती संभाजीनगर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या दोघांविरूद्ध पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्यामुळे अटक संदर्भात नोंद बुधवारी (दि. ९) रात्री पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी घेतली आहे. या बँकेच्या घोटाळा प्रकरणी आत्तापर्यंत तीन संशयित आरोपींना अटक झालेली असून २१ जणांविरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील विविध गावातील व्यापाऱ्यांनी व सर्वसामान्य खातेदारांनी ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या पैठण शाखेत ज्यादा व्याज देण्याच्या आमिषाला बळी पडून पाच कोटीहून अधिक रक्कम ठेवली होती. मुदत संपून देखील खातेदारांची ठेवलेली ठेव परत मिळत नसल्याने तसेच ही शाखा पैठण मधून बंद केल्याने खातेदारांनी ज्ञानराधा बँकेविरुद्ध ५ महिन्यापूर्वी संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे व प्रमुख संचालक पत्नी अर्चना सुरेश कुटे यांच्यासह संचालक मंडळाविरुद्ध ९ जून रोजी तक्रार दाखल केली होती. घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने सदरील तपास तत्कालीन ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांनी या घोटाळ्याचा तपास छत्रपती संभाजीनगर येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. गुन्हा दाखल होताच ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेचे अनेक संचालक फरार झाले होते. यापूर्वी पोलीस पथकाने छत्रपती संभाजी नगर येथील सिडको बस स्थानकावरून पैठण शाखेचे मॅनेजरला अटक केली आहे.

बुधवारी संस्थापक अध्यक्ष कुटे (वय ४८, रा. एमआयडीसी चमडा फॅक्टरी, बार्शी रोड हनुमाननगर, बीड) व संचालक आशिष पद्माकर पाटोदेकर पाटील (वय ३२, रा. २०४ दक्षिण कसबा, सोलापूर) यांना छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे एपीआय सातोदकर यांच्या पथकाने अटक करून पैठण पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT