अंधश्रद्धेमुळे घेतला जातोय कासवांचा जीव 
छत्रपती संभाजीनगर

World Turtle Day : अंधश्रद्धेमुळे घेतला जातोय कासवांचा जीव; अनेक प्रजाती धोक्यात

मराठवाड्यातील "चिखली" प्रजातीची संख्या घटली

पुढारी वृत्तसेवा
मुकेश चौधरी

छत्रपती संभाजीनगर : कधीकाळी घराच्या आसपास, विहिरीत आढळणारे कासव आज मूर्तीस्वरुपात मंदिराच्या गाभाऱ्यात अधिकतर बोटातील अंगठीत किंवा तुरळक प्रमाणात समुद्र किनारी दिसून येतात. कारण गुप्तधनाचा शोधक कासव असल्याच्या भ्रामक कल्पनेतून आजच्या विज्ञानवादी युगातही कासवांची मोठ्या प्रमाणात केली जाणारी तस्करी आणि दिला जाणारा कासवांचा बळी यामुळे भारतातून कासवाच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

मराठवाड्यात आढळणार्‍या सर्वाधिक चिखली प्रजातीच्या कासवांची संख्या घटली असून घरात कासव पाळणे, हा कायद्याने गुन्हा आहे. मराठवाड्यात मुख्यत: जमिनीवरचे व गोड्या पाण्यातील कासव आढळतात. त्यातही चिखलात वावरणारा चिखली या प्रजातीची संख्या अधिक होती. मात्र, अंधश्रद्धेपोटी काही लोक घरात शांतता नादांवी, भरभराटी यावी, यासाठी कासव पाळतात. त्यातूनच मराठवाड्यात सर्वाधिक आढळणाऱ्या चिखली प्रजातीच्या कासवांची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. त्यांना क्रूर पद्धतीने बंदिस्त केले जाते. गेल्या काही वर्षांत या कासवांची शिकार करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून या प्रजातींच्या संख्या झपाट्याने घटली आहे.

हिंदू धर्मात कासवाला अध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असून मंदिरामध्ये देवापुढे असलेले कासव महत्त्वाचे मानले जाते. हिंदू आख्यायिकांनुसार भगवान विष्णूचा कासवरूपी हा दुसरा अवतार मानला जातो. तर दुसरीकडे याच कासवांना गुप्तधनाचे शोधक मानून २० नखी, २१ नखी कासवांची तस्करी करून बळी दिला जातो.

अंध्दश्रद्धेपोटी कासवांची तस्करी

कासव बाळगल्याने भरभराट होते, असा अनेकांचा समज असून, तस्करांकडून कासवांची खरेदी केली जाते. कासवांची किंमत नखांवरून ठरते. यात २४ आणि २६ नखे असलेल्या कासवांसाठी मोठी किंमत मोजली जाते. भारतात बऱ्याचदा अंधश्रद्धा हे कासव तस्करीचे कारण आहे.

२१ नखींची सर्वाधिक तस्करी

पाऊस पाडणे, गुप्तधन शोधण्यासाठी २१ नखी कासव, ५ किलो वजनाचा काळा कासवाच्या शोधात तस्करांकडून अनेक कासव पकडले जातात. मोठ्या प्रमाणात या कासवांची तस्करी केल्या जाते. पैशांचा पाऊस पाडण्याच्या नादात दरवर्षी हजारो कासव मारले जातात.

जगातील सर्वात जास्त कासवांच्या प्रजाती भारतात आहेत. पण यातील बहुतांश जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ च्या कायद्यानुसार कासव संरक्षित केला गेला आहे. या कायद्याचे उल्लंघन करून कासव पाळणे, शिकार करणे, तस्करी करणे किंवा तसे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ३ ते ७ वर्षांचा कारावास आणि २५ हजार रुपये दंड अशी जबर शिक्षा आहे.
किशोर पाठक, मानद वन्य जीव रक्षक, छत्रपती संभाजीनगर वनविभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT