Students who want to do PhD research under Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University have faced difficulties
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत पीएचडीचे संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. प्रवेशपूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने मार्गदर्शकाचे (गाईड) संमतीपत्र आणण्यास सांगितले आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांना मेरीटमध्ये नाव असूनही संबंधित गाईडकडून असे संमतीपत्र मिळू शकलेले नाही.
विद्यापीठाच्यावतीने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी पेट (पीएचडी प्रवेशपूर्व) परीक्षा घेण्यात आली. त्याचा निकाल १५ ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. एकूण ९ हजार १६६ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.
परीक्षेत २००१ विद्यार्थी पात्र ठरले. तर पेटमधून सवलत मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १८२४ इतकी आहे. सन २०२५ मध्ये एकूण ३८२५ विद्यार्थ्यांनी आरआरसी समोर सादरीकरण केले. सादरीकरणानंतर पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना लगेचच संशोधनासाठी गाईड उपलब्ध करून त्यांचे संशोधन कार्य सुरू होणे अपेक्षित होते. मात्र विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना संबंधित गाईडकडून संमतीपत्र आणण्यास सांगितले. परंतु आता अनेक विद्यार्थ्यांना पात्र ठरवूनही गाईडकडून संमतीपत्र मिळत नसल्याचे चित्र आहे. परिणामी विद्यार्थ्यांची धावाधाव सुरू आहे.अधिसभा सदस्यांची कुलगुरूंकडे मागणी
असंख्य विद्यार्थ्यांना संमतीपत्र देण्यास गाईड टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे विद्यार्थी हतबल झाले आहेत. मुळात पीएचडी प्रवेशासाठी विद्यार्थी पात्र ठरल्यानंतर संमतीपत्राची अट कशाला हवी. विद्यापीठानेच सर्वांना गाईड उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी अधिसभा सदस्य हरिदास सोमवंशी यांनी केली आहे. सोमवंशी यांनी बुधवारी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांची भेट घेऊन याबाबत त्यांना निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी दिग्विजय शिंदे तसेच संशोधक विद्यार्थी अंकुश सोनवणे, काकासाहेब गरुड आदी उपस्थित होते.