New Books : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती नवी पुस्तके Pudhari Photo
छत्रपती संभाजीनगर

New Books : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती नवी पुस्तके

गंगापूर तालुक्यात ३३१ शाळांतील ५३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी नियोजन

पुढारी वृत्तसेवा

Students received new books on the very first day of school

रमाकांत बन्सोड

गंगापूर : उन्हाळी सुटी संपल्यानंतर १५ जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असून, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात नवीन पाठ्यपुस्तके देण्यासाठी शिक्षण विभागाने जय्यत तयारी केली आहे. गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद, शासकीय व खासगी अनुदानित शाळांसाठी आवश्यक पुस्तकांपैकी सुमारे ८० टक्के पुस्तके गट साधन केंद्रात दाखल झाली असून उर्वरित पुस्तके येत्या दोन दिवसांत प्राप्त होणार आहेत.

तालुक्यात मराठी व उर्दू माध्यमाच्या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या एकूण ३३१ लाभार्थी शाळांमध्ये ५३ हजार ५८५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने बालभारतीकडे ३ लाख ९ हजार ६५६ पुस्तकांची मागणी नोंदविली होती. त्यापैकी आतापर्यंत २ लाख ४७ हजार ३५२ पुस्तके तालुकास्तरावर प्राप्त झाली आहेत. उर्वरित ६२ हजार ३०४ पुस्तके येत्या दोन दिवसांत मिळणार असून त्यानंतर केंद्रस्तरावरून शाळांना वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके उपलब्ध व्हावीत, यासाठी शिक्षण विभागाने ऑनलाइन बैठकीद्वारे सर्व केंद्रप्रमुखांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. वितरण प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, शासनाकडून गणवेशासाठीची रक्कम शाळा व्यवस्थापन समित्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. गणवेश खरेदीचे अधिकार समित्यांना देण्यात आले असून विद्यार्थ्यांना दर्जेदार गणवेश मिळावा यासाठी सामाजिक दायित्व निधीतूनही मदत उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गणवेश व पाठ्यपुस्तकांच्या वितरणात कोणत्याही प्रकारची दिरंगाई, हलगर्जीपणा अथवा गैरव्यवहार आढळल्यास संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.

विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासूनच पुस्तके मिळावीत यासाठी ३ लाख ९ हजार ६५६ पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी २ लाख ४७हजार ३५२ पुस्तके प्राप्त झाली आहेत. उर्वरित ६२ हजार ३०४ पुस्तके दोन दिवसांत मिळतील. त्यानंतर तातडीने शाळांना वितरण केले जाईल.
अरविंद कापसे, गटशिक्षणाधिकारी, गंगापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT