विद्यार्थ्यांच्या दिंड्यांनी अनुभवली पंढरीची वारी file photo
छत्रपती संभाजीनगर

Ashadhi Ekadashi : विद्यार्थ्यांच्या दिंड्यांनी अनुभवली पंढरीची वारी

गावागावात हरिनामाचा गजर; वारकरी परंपरेचे दर्शन

पुढारी वृत्तसेवा

Student processions experienced the Pandhari Wari

कन्नड, पुढारी वृत्तसेवा आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त कन्नड तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील विविध शाळांनी काढलेल्या विद्यार्थ्यांच्या दिंड्यांमुळे संपूर्ण तालुका भक्तिरसात न्हाऊन निघाला. पारंपरिक वारकरी वेशभूषा, विठ्ठल-रुक्मिणीचे सजीव रूप, टाळ-मृदंगाचा गजर, अभंग आणि हरिनामाच्या घोषात निघालेल्या दिंड्यांनी गावागावात जणू पंढरपूरच्या वारीचे दर्शन घडविले.

दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांनी डोक्यावर तुळशी वृंदावन, भगवी पताका, गळ्यात तुळशीमाळ, कपाळावर गंध आणि हातात टाळ घेऊन वारकरी परंपरेचे दर्शन घडविले. विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गावातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या दिंड्यांमधून समता, भक्ती आणि संस्कारांचा संदेश देण्यात आला.

शहरातील साधना पाटील विद्यालय, साने गुरुजी विद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालय, मदर गंगा इंग्लिश स्कूल, न्यू हायस्कूल तसेच ग्रामीण भागातील हतनूर येथील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांसह अनेक शाळांच्या दिंड्या विशेष आकर्षण ठरल्या. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची माहिती देत शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात दिंडीचे आयोजन केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, संतांचे विचार आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची ओळख झाली. शाळांच्या या उपक्रमाचे पालक, ग्रामस्थ आणि नागरिकांनीही कौतुक केले असून, कन्नड तालुक्यात आषाढी एकादशीचा उत्सव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी गावा गावात दिंडीचे भाविकांना उत्साहात स्वागत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT