Sambhajinagar Street Crime pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Street Crime : स्ट्रीट क्राईमचा भडका

मॉर्निंग वॉकपासून ते रात्रीच्या शतपावलीपर्यंत नागरिक असुरक्षित !

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले असून, गुन्हेगारांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून उच्छाद मांडला आहे. जाफर गेटजवळ भरदिवसा व्यापाऱ्याला खाली पाडून लुटणे, सिडकोत मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्धेला लॉटरीचे आमिष दाखवून दागिने लुबाडणे आणि रात्री शतपावली करणाऱ्या शिक्षकाला रिक्षातून आलेल्या टोळीने लूटमार करून पळणे या तीन घटनांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

तुमच्या मुलाची लॉटरी लागली म्हणत वृद्धेचे दागिने लुबाडले

फिर्यादी प्रतिभा व्यंकटराव भोसले (६०, रा. सिडको एन-९, रायगडनगर) यांच्या तक्रारीनुसार, त्या रविवारी (दि.२६) सकाळी ८.१५ वाजेच्या सुमारास बळीराम पाटील शाळा ते सावरकर चौक येथे पायी फिरण्यासाठी गेल्या होत्या. मॅपल हॉस्पिटलसमोर एका दुचाकीस्वाराने त्यांना गाठले आणि तुमच्या मुलाची लॉटरी लागली आहे, ती घेण्यासाठी माझ्यासोबत चला, अशी बतावणी केली. प्रतिभा यांनी माझा मुलगा घरीच आहे त्याला घेऊन जा, असे म्हटले. तरीही त्याने तुम्हीच चला, असे म्हणत भामट्याने त्यांना गाडीवर बसवून एन-८ येथील नगरसेवक विश्वनाथ स्वामी यांच्या घरासमोर नेले.

तेथे त्यांना दागिन्यांची मागणी करत त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मिनी गंठण आणि साडेतीन ग्रॅमची सोन्याची अंगठी काढून घेतली. मी बहिणीला भेटून येतो, असे सांगून भामटा पसार झाला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिक्षाचालकाच्या टोळीने शिक्षकाला लुटले; चौघे अटकेत

शतपावली करणाऱ्या शिक्षकाला लुटणाऱ्या रिक्षा चालकासह त्याच्या तीन साथीदारांना सिडको पोलिसांनी रविवारी (दि. २६) बेड्या ठोकल्या. शेख तौसिफ शेख नासेर, शोएब निजाम शहा, सफोद्दीन अझरुद्दीन खान, रेहान अखिल देशमुख (सर्व रा. कटकटगेट परिसर) अशी आरोपींची नावे असून, त्यांना न्यायालयाने ३० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती सिडको ठाण्याचे पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.

फिर्यादी प्रदीप पांडुरंग नांदेडकर (४९, रा. गजराजनगर, एन-८) हे शिक्षक असून, कोचिंग क्लासेस चालवितात. गुरुवारी (दि. २३) रात्री जेवण करून सुरभी हॉटेलसमोरून पायी चालत होते. रात्री १०.३० च्या सुमारास (एमएच-२०-डीसी-३०७४) या क्रमांकाच्या रिक्षामधून आलेल्या चौघांनी त्यांना अडवले. त्यातील एकाने त्यांच्या शर्टची कॉलर पकडून खर्चासाठी १०० रुपये दे, अशी मागणी करत खिशात हात घातला.

खिशात काहीही न मिळाल्याने त्याने नांदेडकर यांच्या उजव्या हाताच्या बोटातील ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात रविवारी (दि. २६) गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर चारही आरोपीना सहायक फौजदार सुभाष शेवाळे, विशाल सोनवणे, मंगेश पवार, देवा साबळे, प्रदीप फरकाडे, अनिल अंभोरे, सचिन हिवाळे यांच्या पथकाने अटक केली.

जाफरगेट परिसरात व्यापाऱ्याला लुटले; भरदिवसा सोनसाखळी लांबवली, क्रांती चौक ठाण्यात गुन्हा

फिर्यादी राजेश रूपचंद रेड्डी (४५, रा. पदमपुरा) यांचे चप्पल बुटाचे दुकान आहे. रविवारी दुकानातील माल घेण्यासाठी मोपेडवरून जाफरगेट, चौधरी पेट्रोलपंपासमोरून जात होते. सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास पांढरा सदरा आणि काळी टोपी घातलेल्या एका धिप्पाड अनोळखी इसमाने त्यांच्या गाडीला जोरात धक्का देऊन त्यांना खाली पाडले. रेड्डी खाली पडताच आरोपीने त्यांचा गळा धरला आणि गळ्यातील १५ ग्रॅमची सोनसाखळी खेचण्याचा प्रयत्न केला. रेड्डी यांनी प्रतिकार केल्याने १० ग्रॅमची साखळी त्यांच्या हातात राहिली, मात्र ५ ग्रॅमचा तुकडा हिसकावून तो भामटा लंगडत पसार झाला. याप्रकरणी क्रांती चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक अशोक इंगोले तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT