Statewide doctors' strike disrupts patient services
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : होमिओपॅथीला एमएनसीमध्ये दिलेली परवानगी रद्द करावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी डॉक्टरांनी चोवीस तासांसाठी राजयव्यापी संप पुकारला असून, गुरुवारी (दि.१८) सकाळपासून सुरू करण्यात आलेला संप शुक्रवारी (दि. १९) सकाळी ८ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने राज्यभरातील रुग्णालयांचे दरवाजे बंद झाले आहेत.
त्यामुळे शेकडो रुग्णांना उपचाराविना परतावे लागले. शहरातील तब्बल ५५० खासगी रुग्णालयांची ओपीडी बंद ठेवण्यात आली आहे. सरकारी, खासगी व महापालिकेच्या रुग्णालयांत केवळ आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. या संपामुळे सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत असून, अचानक सुमारे २०० शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
होमिओपॅथीसह इतर पध्दतीच्या वैद्यकीय शाखांना अॅलोपॅथीमध्ये प्रवेश नाकारवा, डॉक्टारांवरील वाढते हल्ले थांबवण्यासाठी कठोर कायदा लागू करावा, यासह इतर मागण्यासाठी राज्यभरातील डॉक्टरांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून संप सुरू केला आहे. हा संप शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल २४ तास सुरू राहणार आहे. त्यामुळे सरकारी, खासगी आणि महापालिका रुग्णालयांत केवळ आपत्कालीन सेवा उपलब्ध असून, इतर सर्व उपचार सेवा ठप्प झाल्या आहेत. डॉक्टरांच्या संपामुळे राज्यभरातील रूग्णसेवा पूर्णतः कोलमडली असून रूग्णाचे अतोनात हाल झाले. परजिल्ह्यातुन आलेल्या रूग्णाना उपचाराविनाच व शस्त्रक्रियाविनाच माघारी परतावे लागले. दरम्यान गर्भवती महिला, लहान मुले, अपघातग्रस्त आणि वृद्ध रुग्णांचे हाल पाहून नातेवाईकांच्या डोळ्यांत पाणी आले. तसेच शस्त्रक्रियाही थांबल्या आहेत. त्यामुळे रूग्णांसह नातेवाईकांमधून आता आमच काय होणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
या संपामुळे शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरातील विविध रूग्णालयातील सुमारे २०० लहानमोठ्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याची माहिती डॉ. सत्यजीत पाथ्रीकर यांनी दिली. यातील काही रूग्णांनी मनाची तयारी करत महिनोंमहिने तारखांची प्रतीक्षा केली. मात्र डॉक्टरांच्या संपामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे रूग्णांसह नातेवाईकांच्या डोळ्यां नातेवाईकांच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात भीती दिसून आली. आता आमचं काय होणार? असा प्रश्न प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटला होता.
संपामुळे आरोग्य सेवेत मोठी उलथापालथ झाली. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी), कर्करोग रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयाने गंभीर आजारग्रस्तांना मोठा आधार दिला. आपत्कालीन विभाग, आयसीयु, प्रसूतिगृह यांसारख्या महत्वाच्या विभागांत सेवा सुरू ठेवल्याचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी स्पष्ट केले.
संपाला अधिक तीव्र करण्यासाठी आयएमएचे शेकडो डॉक्टर क्रांती चौकात निदर्शनास उतरले. हातात फलक, बॅनर घेऊन त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. रुग्णांचे जीवन धोक्यात घालू नका, होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीत प्रवेश नाही अशा घोषणा देत डॉक्टरांनी सरकारला थेट इशारा दिला. या निदर्शनात आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर, डॉ. योगेश लक्कस, डॉ. यशवंत गाडे, डॉ. उज्वला दहिफळे, डॉ. संतोष रंजलकर, डॉ. राजेंद्र गांधी, डॉ. गितेश दळवी, डॉ. प्रतिमा भाले, डॉ. असावरी टाकळकर, डॉ. सोनाली सावजी, डॉ. दत्ता कदम, डॉ अर्चना साने, डॉ जितेन कुलकर्णी, डॉ अनंत कुलकर्णी, डॉ प्रसन्न उनवणे, डॉ. अभय पोहेकर यांच्यासह अनेक वरिष्ठ डॉक्टरांनी सहभाग घेतला. मार्ड संघटनेच्या डॉक्टरांनी घाटी रुग्णालयासमोर ठिय्या देऊन संताप व्यक्त केला.