ST Bus : 32 additional buses on various routes for passengers on the occasion of Diwali
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कामानिमित्त शहराबाहेर किंवा शहरात असणारे चाकरमाने दिवाळीत आपापल्या गावी जातात. या दरम्यान होणारी गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने विविध मार्गांवर जादा बससेवा देण्याचे नियोजन केले आहे. या काळात छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वच आगारांतून सुमारे ३२ जादा बस सेवा देण्यात येणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी दिली.
नुकतेच पितृपक्ष पंधरवडा संपला त्यानंतर विविध मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. ही गर्दी येणाऱ्या दिवसांत जास्त वाढणार आहे. दिवाळीनिमित्त तर यात मोठ्या प्रमाणात वाढ होते. ही बाब लक्षात घेऊन लांब पल्ल्याच्या आणि गर्दी असलेल्या मार्गावर जादा बससेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वच आगारांतून ही सेवा देण्यात येणार आहे. यात नागपूर, अकोला, लातूर, पुणे, बुलढाणा, जळगाव, भुसावळ, नाशिक, धुळे, शिर्डी, आदी मार्गांचा समावेश आहे. दिवाळी काळात सर्वच मार्गांवर प्रवाशांची गर्दी असल्याने त्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे.
दिवाळीनिमित्त धा-वणाऱ्या या बसेसना कोणत्या आगारांतून कोणत्या मार्गावर सोडायाचे आणि त्या बसने किती किलोमीटर अंतरापर्यंत सेवा द्यायची याचे नियोजन करण्यात आले आहे. या ३२ बसेस दिवाळी दरम्यान सुमारे १४ हजार ५३८ किलोमीटरच्या अंतरापर्यंत प्रवाशांना सेवा देणार असल्याचीही माहिती घाणे यांनी दिली.