Speeding Vehicle Collides with Two-Wheeler; Two Workers Killed
वाळूज, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगरड्डपुणे महामार्गावरील लिंबेजळगाव येथील पिट्टी कंपनीजवळ भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कंपनीतील दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी (दि. १९) रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडला.
पंढरीनाथ सिताराम दिवटे (वय ३५) आणि संजय दामोदर तांबे (वय ४०) अशी मृतांची नावे आहेत. तर नवनाथ मोहन दिवटे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येसगाव येथील पंढरीनाथ दिवटे, नवनाथ दिवटे आणि संजय तांबे हे तिघे कंपनीतील काम आटोपून दुचाकी (एम एच २० डी एक्स ६८०६) वरून घरी परतत होते. दरम्यान, लिंबेजळगाव येथील पिट्टी कंपनीजवळ भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच इसारवाडी फाटा येथील श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज नाणीज धामच्या विनामूल्य रुग्णवाहिकेचे पायलट संदीप त्रंबके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच पंढरीनाथ दिवटे आणि संजय तांबे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेतील दोन्ही मृत कामगारांवर बुधवारी दुपारी येसगाव शिवारात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहायक उपनिरीक्षक दशरथ खोसरे पुढील तपास करीत आहेत.
फरार वाहनाचा शोध सुरू
अपघातानंतर अज्ञात वाहनचालक वाहनासह फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. संबंधित वाहन लवकरच चालकासह ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक पंढरीनाथ पाढरे यांनी दिली.