सोयगाव : खरीप हंगामाच्या तोंडावर शासनाने सुरू केलेल्या ऑनलाईन खत विक्री प्रणालीमुळे सोयगाव तालुक्यातील शेतकरी आणि खत विक्रेते दोघेही अडचणीत सापडले आहेत. तांत्रिक त्रुटी, बायोमेट्रिक पडताळणीतील अडथळे, युरिया वाटपावरील निर्बंध आणि संथ झालेली विक्री प्रक्रिया यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव नाराजी निर्माण झाली आहे. ऑनलाईन खत विक्रीसाठीचे ॲप तात्काळ रद्द करावे आणि पीक विम्यातील पूर्वीचे ट्रिगर निकष पुन्हा लागू करावेत, अन्यथा तीव आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
या मागण्यांसंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, फार्मर आयडी शोधणे, जमिनीच्या क्षेत्रानुसार खताची मर्यादित नोंदणी करणे आणि क्यूआर कोडची सक्ती यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग््राामीण भागातील अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसल्याने तसेच इंटरनेट सुविधा अपुरी असल्याने खत खरेदीची प्रक्रिया अधिकच क्लिष्ट बनली आहे.
शासनाच्या निर्देशानुसार तालुक्यात रासायनिक खतांची ऑनलाईन विक्री सुरू करण्यात आली आहे. मात्र ॲप व्यवस्थित कार्यरत नसल्याने खत खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेकदा अंगठ्याची पडताळणी होत नसल्याने व्यवहार रखडत असून, शेतकऱ्यांचा संताप वाढत आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एका एकरासाठी केवळ एकच गोणी युरिया देण्याची अट अव्यवहार्य आहे. शेतीच्या गरजा लक्षात घेऊन किमान दोन ते तीन गोण्या युरियाचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. तसेच अंगठ्याऐवजी ओटीपीद्वारे पडताळणीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
ऑनलाईन प्रक्रियेमुळे खत वितरणाचा वेग मंदावल्याने दुकानदार आणि शेतकरी यांच्यात वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. शेतकरी कृषी सेवा केंद्राचे संचालक पप्पू काळे यांनी सांगितले की, शासनाच्या निर्बंधांमुळे वेळेत खत वितरण करणे कठीण झाले आहे. ॲपमधील तांत्रिक अडचणींचा रोष विक्रेत्यांवर निघत असून, परिस्थिती तणावपूर्ण बनत आहे. येत्या दोन ते चार दिवसांत व्यवस्था सुरळीत होईल. अशी माहिती तालुका कृषी अधिकारी भरत कासार यांनी दै. पुढारीशी बोलतांना दिली.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
अंगठ्याऐवजी ओटीपी पडताळणीची सुविधा सुरू करावी.
ऑनलाईन ॲपमधील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर कराव्यात.
वाटपावरील निर्बंध शिथिल करावेत.
खरीप हंगामात खतांचा पुरेसा व वेळेवर पुरवठा करावा.
पीक विम्यातील पूर्वीचे ट्रिगर निकष पुन्हा लागू करावेत.
मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास तहसील कार्यालयावर तीव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.