औरंगाबाद खंडपीठ pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Somnath Suryavanshi death case : सोमनाथ सूर्यवंशी कोठडीत मृत्यू प्रकरण : खंडपीठाने निकाल ठेवला राखून

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद करताना गृहमंत्र्यांना पाचारण करण्याची मागणी लावून धरली.

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शुक्रवारी (दि.13) महत्त्वाची सुनावणी झाली. मूळ याचिकेत दुरुस्ती अर्ज दाखल केल्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, न्यायमूर्ती संदीपकुमार मोरे आणि न्यायमूर्ती आबासाहेब शिंदे यांनी या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला आहे.

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे आणि संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी सोमनाथच्या आई विजया सूर्यवंशी यांनी याचिका दाखल केली आहे. त्यांची बाजू ॲड. प्रकाश आंबेडकर मांडत आहेत.

या प्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या जबाबानंतर त्यावर पुढील कार्यवाही कुणी व कशी करावी, याबाबत कायद्यात स्पष्टता नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या संदर्भात धोरणात्मक खुलासा करण्यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांना न्यायालयात बोलावण्याची विनंती ॲड. आंबेडकर यांनी केली होती. मात्र मूळ याचिकेत ही मागणी नसल्याने न्यायालयाने दुरुस्तीसाठी एक आठवड्याचा वेळ दिला होता.

दुरुस्ती अर्ज सादर केल्यानंतर शुक्रवारी (दि.13) त्यावर पुन्हा सुनावणी झाली. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद करताना गृहमंत्र्यांना पाचारण करण्याची मागणी लावून धरली. त्यानंतर सरकारच्या वतीने अमरजितसिंह गिरासे यांनी प्रतिवाद केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने दुरुस्ती अर्जावरील निकाल राखून ठेवला आहे. मूळ याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काम पाहिले, त्यांना ॲड. मिलिंद संदानशिव यांनी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT