Sillod News: Urea being sold at inflated prices
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा :
तालुक्यात युरिया खताची चढ्या भावाने विक्री केल्या जात असल्याच्या तक्रारीवरून कृषी विभागाने डमी ग्राहक पाठवून दोन कृषी सेवा केंद्रांवर कारवाई केली. ही कारवाई रविवारी (दि.४) तालुक्यातील पानवडोद बुद्रुक येथे करण्यात आली.
श्री सिद्धेश्वर कृषी सेवा केंद्र, विक्रांत कृषी सेवा केंद्र अशी कारवाई करण्यात आलेल्या कृषी सेवा केंद्रांची नावे आहेत. तालुक्यात यंदा मुबलक पाणी असल्याने मका, गव्हाचा पेरा वाढलेला आहे. यामुळे रब्बी हंगामातही युरियाची मागणी वाढलेली आहे.
याचा फायदा घेत कृषी सेवा केंद्र मालक युरियाची चढ्या भावाने विक्री करीत आहे. या संदर्भात तक्रार करण्यात आली होती. तर या अनुषंगाने विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरचे भरारी पथक प्रमुख तथा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक हरिभाऊ कातोरे, तालुका गुण नियंत्रण निरीक्ष प्रमोद डापके यांनी डमी ग्राहक पाठवला असता युरियाची ३७० रुपये प्रमाणे विक्री केल्याचे, तर एका कृषी सेवा केंद्रावर खत उपलब्ध असताना दिले नसल्याचा प्रकार समोर आला.
या प्रकरणी वरील दोन्ही कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली. दरम्यान तालुक्यात खताची चढ्या भावाने विक्री केल्याचा प्रकार काही नवा नाही. दरवर्षी असे प्रकार समोर येतात. अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने तक्रारीची वाट न पाहता गुप्त माहिती मिळवून कारवाया करणे गरजेचे आहे. तरच चढ्या भावाच्या विक्रीला पूर्णतः आळा बसेल.