Sillod Municipal Council Election: Candidates and supporters
प्रा. मन्सूर कादरी
सिल्लोड: सिल्लोड नगरपरिषदेच्या १४ प्रभागांमधून निवडल्या जाणाऱ्या २८ नगरसेवकांसोबत जनतेतून थेट निवडल्या जाणाऱ्या नगराध्यक्षपदासाठी २ डिसेंबर रोजी मतदान पार पडले. २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होताच शहरात असलेली राजकीय शांततेच्या मागचे खरे राजकीय तापमान नेमके किती होते, कोणाची फसगत झाली आणि कोणाचा डाव जमला हे सर्व चित्र शहरासमोर स्पष्ट होणार आहे. सध्या मात्र सगळ्याच राजकीय नेत्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव तणावाची शांतता आणि धडधडत्या प्रतीक्षेची लय.
१९९० रोजी नगरपरिषदेची स्थापना झाल्यापासून २०२५ पर्यंत ही ७ वी सार्वत्रिक निवडणूक ठरली आहे. परंपरेने सिल्लोड नगरपरिषदेची निवडणूक ही जिल्ह्यातील इतर निवडणुकीपेक्षा अधिक रंगतदार, अधिक तापलेली आणि मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीमुळे राजकीयदृष्ट्या हॉट मानली जात असे. यंदाची निवडणूक मात्र आश्चर्यकारकपणे शांत, सामसूम अशीच राहिली असे असले तरी निकाल कोणाच्या बाजूने लागणार याची चर्चा मात्र जोरात आहे.
२ डिसेंबर रोजी मतदानाच्या वेळी शहरातील चौक-चावड्यांपासून पानटपऱ्या, चहाचे हॉटेल, सलून, ढाब्यांपर्यंत निवडणूक चर्चांनी बाजार भरलेला होता. कोणत्या प्रभागात कोण आघाडीवर? कोण जिंकणार? कोणाचा तोरा ?
अशा प्रश्नांनी वातावरण पेटलेले होते. पण दुपारी मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर चित्र बदलले. सुरुवातीचे दोन-तीन दिवस कोण जिंकणार याबाबत रंगलेल्या चर्चा चौथ्याच दिवसापासून थंड पडू लागल्या. नेहमीप्रमाणे पैजा, दावे-प्रतिदावे, गावोगावी भांडणाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचणारे ताणतणावः यंदा काहीच दिसून येत नाही. काहीजण तर पहिलीच निवडणूक आहे जी इतकी शांत दिसते अशी चर्चा करू लागले.
उमेदवारांच्या खिशावर ताण
मतमोजणीत झालेल्या विलंबामुळे पंधरा दिवसांपासून कार्यकर्त्यांचे चहापाणी, जेवण, प्रचारकांचा मुक्काम हे सर्व पुन्हा वाढू लागले आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांच्या खिशावर मोठा आर्थिक ताण पडत असल्याचे दिसत आहे.
सर्वसामान्य निवांत
मतमोजणी १८ दिवसांनी पुढे गेल्याने सगळ्या राजकीय घरात वाट पाहणे हाच पर्याय असल्याची जाणीव झाली. सामान्य नागरिकदेखील यंदा चर्चापासून दूर राहिलेला दिसतो. ज्यांना निवडणुकीत काही घेणेदेणे नाही ते मात्र यंदाची शांत, तणावमुक्त निवडणूक पाहत निवांत मजा घेत आहेत. विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांची मात्र अमुकने रसद दिली, तमुकने पाठिंबा बदलला, कुठेतरी गडबड झाली अशा चर्चांनी रात्रीची झोप हरवलेली आहे. अनेक ठिकाणी उमेदवारांच्या घरात गटांमध्ये मात्र टेन्शन वाढले