Siddhartha Udyan has become dangerous
सचिन लहाने
छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी महत्त्वाचे मानले जाणारे सिद्धार्थ उद्यान सध्या गंभीर सुरक्षिततेच्या प्रश्नामुळे चर्चेत आले आहे. उद्यान परिसरात असलेल्या काही झाडांना चिंचेसारखी दिसणारी, मात्र तब्बल दोन ते तीन किलो वजनाची फळे लागलेली असून, ती अचानकपणे तुटून खाली पडत आहेत. चिंतेची बाब म्हणजे ही फळे थेट त्या भागात पडत आहेत जिथे लहान मुलांची खेळणी, घसरगुंडी, झोके आणि पालकांची वर्दळ अधिक असते.
अपघाताचा धोका किती गंभीर ?
या झाडांची उंची अंदाजे २५ ते ३० फूट इतकी आहे. अशा उंचीवरून दोन ते तीन किलो वजनाचे फळ खाली कोसळल्यास, एखाद्या लहान मुलाच्या डोक्यावर किंवा पालकांच्या अंगावर पडल्यास गंभीर दुखापत होण्याची, अगदी प्राणघातक अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही.
सुदैवाने आतापर्यंत मोठी दुर्घटना घडलेली नसली, तरी अपघात होईपर्यंत वाट पाहायची का? असा थेट प्रश्न उपस्थित होत आहे. सिद्धार्थ उद्यान हे शहराचे भूषण मानले जाते. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तेच उद्यान आज लहान मुलांसाठी धोक्याचे ठिकाण बनत असल्याचे चित्र आहे. एखादी घडण्याआधीच प्रशासनाने दुर्घटना महानगरपालिका तातडीने लक्ष घालून आवश्यक उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे.
देखभाल व्यवस्थेवर सवाल
महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत नियमित देखभाल, झाडांची छाटणी व धोकादायक फांद्या अथवा फळे काढून टाकणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी अशी कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. उद्यानात दररोज शेकडो कुटुंबे, शालेय मुले आणि ज्येष्ठ नागरिक येत असताना ही निष्काळजीपणा अधिक चिंताजनक ठरतो.
धोकादायक झाडांची तातडीने तपासणी
जड फळे व फांद्या त्वरित काढून टाकणे
खेळण्यांच्या परिसरात सुरक्षात्मक उपाययोजना
उद्यानात धोका सूचक फलक लावणे