गंगापूर : तालुक्यातील सिध्दनाथ वाडगाव येथील 33 केव्ही सब स्टेशनअंतर्गत येणाऱ्या शहापूर, पळसगाव व घोडेगाव परिसरातील शेती पंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. पाच-पाच मिनिटांत वीज खंडित होणे, तसेच तांत्रिक बिघाडाच्या कारणावरून तासनतास पुरवठा गायब राहणे, यामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत.
विजेच्या लपंडावामुळे गहू, हरभरा, ज्वारी, हिवाळी मका, कांदा आदी पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाने दिवसा आठ तास वीजपुरवठा देण्याचे आश्वासन दिले असले, तरी प्रत्यक्षात ठरवून दिलेल्या वेळापत्रकातही विजेचा भरवसा राहत नाही, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
वीज केव्हा जाईल आणि केव्हा येईल याचा नेम नसल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिसरात मुबलक जलसाठा उपलब्ध असूनही केवळ विजेअभावी पिके कोमेजण्याची वेळ आली आहे.
याच सब स्टेशनअंतर्गत इतर काही गावांमध्ये अखंडित वीजपुरवठा होत असताना केवळ शहापूर फीडरवरच वारंवार खंड पडत असल्याचा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून शेती पंपांसाठी अखंडित आठ तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
कायमस्वरूपी समस्या सोडवा
महावितरणकडून ओव्हरलोडमुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, वारंवार ओव्हरलोड होत असेल तर जादा क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवून समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अखंडित वीजपुरवठा न झाल्यास तीव आंदोलनाचा इशाराही शेतकरी वर्गातून देण्यात आला आहे.