World Sickle Cell Day : सिकलसेल रुग्णांना सतावते जीवघेणे दुखणे File photo
छत्रपती संभाजीनगर

World Sickle Cell Day : सिकलसेल रुग्णांना सतावते जीवघेणे दुखणे

तज्ज्ञ म्हणतात : लग्नाआधी प्रत्येकाने रक्त तपासणी करणे आवश्यक

पुढारी वृत्तसेवा

Sickle cell patients suffer from pain

राहुल जांगडे

छत्रपती संभाजीनगर : सतत थकवा, अशक्तपणा आणि शरीराच्या दुखण्यामुळे सिकलसेल रुग्णांचे संपूर्ण जीवनच वेदनादायी होते. जनुकीय दोषामुळे होणाऱ्या रक्ताच्या या अनुवंशिक आजारामुळे रुग्णांना जगण्यासाठी रोज मरावे लागते. त्यामुळे सिकलसेलच्या प्रतिबंधासाठी एक तर नात्यात लग्न नको आणि दुसरे म्हणजे लग्नापूर्वी प्रत्येकाने रक्त तपासणी करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

दरवर्षी १९ जून रोजी जागतिक सिकलसेल जागरूकता दिवस हा या आजाराबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो. सिकलसेल हा एक प्रकारे हिमोग्लोबिनचा आजार असून, जनुकीय दोषांमुळे रक्तांच्या पेशींमध्ये हिमोग्लोबिनचा दोष निर्माण होतो.

यामध्ये ऑक्सिजन कमतरतेमुळे लाल रक्तपेशी विळ्याच्या आकाराच्या होतात. काही विशिष्ट घटकांमध्ये हा रोग अधिक प्रमाणात आढळतो. राज्यात नंदुरबार, वर्धा आणि मराठवाड्यात सोयगाव, बीड-गेवराई यासह जंगली भागात आढळतो. त्यातही या आजाराचे सिकलसेल वाहक किंवा पीडित व्यक्तीने एकमेकांशी लग्न केल्यास त्यांच्या होणाऱ्या अपत्यातही सिकलसेल गुणधर्म आढळण्याचा धोका अधिक असतो. असे तज्त्र म्हणतात. त्यामुळे या आजाराला रोखण्यासाठी विवाहयोग्य गटातील स्त्री-पुरुषांनी आवर्जून रक्त तपासणी करून घ्यावी, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला. केंद्र शासनाने २०४७ पर्यंत सिकलसेल, अॅनिमिया या आजारांचे उच्चाटन करण्याचा संकल्प केला आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयात तपासणी, औषधोपचार केले जात आहे.

काय असतो सिकलसेल रुग्णांना त्रास

▶ अशक्तपणा, शरीरात असह्य वेदना

▶ रोगप्रतिकार शक्ती कमी होणे

▶ दम लागणे, परत-परत कावीळ होणे

▶ संसर्ग, निमोनिया झाल्यास जीवाचा धोका

▶ उपचार आणि प्रतिबंधासाठी काळजी

▶▶ अशा रुग्णांनी त्वरित रक्तविकार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. दररोज एक गोळी आणि भरपूर पाणी प्यावे. मुख्य म्हणजे रक्ताच्या नात्यात लग्न करू नये.

लग्नापूर्वी एचबी इलेक्ट्रोफोरसिस चाचणी

रक्ताच्या नात्यात लग्न होतात त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये सिकलसेल आजाराचा धोका असतो. कुटुंबात अशी हिस्ट्री असलेल्यांनी लग्नापूर्वी एचबी इलेक्ट्रोफोरसिस चाचणी करून घ्यावी. इतर प्रत्येक मुला-मुलींनीही लग्नाआधी ही तपासणी करून घ्यावी.
-डॉ. श्वेता तोष्णीवाल, एम.डी. पॅथॉलॉजी

देशात दरवर्षी दीड लाख सिकलसेल अपत्य

सिकलसेल अॅनिमिया रुग्णांची नोंद नसली तरी देशभरात १२ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. आई-वडिलांना मायनर सिकलसेल असला की त्यांच्या अपत्यास मेजर सिकल सेलचा धोका होतो. दरवर्षी असे दीड लाखांहून अधिक मुले जन्माला येतात. यासाठी जनजागृती, निदान आणि उपचार गरजेचे आहे.
-डॉ. मनोज तोष्णीवाल, रक्तविकार तज्ज्ञ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT