छत्रपती संभाजीनगर : पक्षाला पुन्हा भरारी देण्यासाठी एक व्यक्ती एक पद हे तत्त्व पाळले पाहिजे. तसेच एकाच व्यक्तीला वीस-वीस वर्ष एका पदावर ठेवणे आणि एकाच घरात चार चार पदे देणे चुकीचे आहे, अशी भावना शिवसेना भवनात आयोजित सत्कार सोहळ्यात जुन्या शिवसैनिकांनी व्यक्त केली.
आमची पोरंबाळं कमावती आहेत. आम्हाला पद नको, पैसा नको, केवळ सन्मान हवा आहे, परंतु आजच्या पक्ष पदाधिकार्यांकडून आमची साधी विचारपूसही होत नाही, अशी खंत या शिवसैनिकांनी बोलून दाखविली.
शिवसेना उबाठा पक्षाच्यावतीने शनिवारी जिल्ह्यातील जुन्या शिवसैनिकांचा सत्कार सोहळा शिवसेना भवनात पार पडला. या मेळाव्यात पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे, उपनेते रवींद्र मिर्लेकर, महानगरप्रमुख राजू वैद्य उपस्थित होते. जिल्ह्याभरातून आलेल्या जुन्या शिवसैनिकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 1985 पासून काम करत असलेल्या शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पदाधिकारी म्हणाले की, तुम्ही जुन्या लोकांना विचारत नाहीत ही आमची खंत आहे. आमच्या वॉर्डात नियुक्ती करताना किमान आम्हाला विचारात घेतले जात नाही. बैठकांना आम्हाला बोलावले जात नाही. लहान पोरांना व्यासपीठावर आणि आम्हाला खाली बसवता. आम्ही इतके वर्ष सेवा केली आम्ही पक्ष सोडला नाही. ज्यांना दोनदा महापौर पद दिले ते सोडून गेले अशी टीकाही पदाधिकार्यांनी केल्या.
शिवसेना उभी राहिली आहे ती निष्ठावंतांच्या त्यागाच्या बळावर उभी राहिली आहे. त्यामुळे आपले हे वागणे बाळासाहेबांच्या विचारासोबत प्रतारणा करणारे असल्याचे खडे बोल उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी सुनावले.
मी शिवसेना भवन सुरू व्हावे यासाठी प्रयत्न केले. मात्र काही पदाधिकारी येथे येत नाहीत. काहींनी स्वत:ची ऑफिसेस सुरू केली आहेत. येथे एक लक्षात ठेवा की आपल्याला उद्वव ठाकरेंना साथ द्यायची आहे. मी मरेपर्यंत हा पक्ष सोडणार नाही. लोकसभा निवडणुकीत निष्ठावंतांनी माझे काम केले. मात्र आता असलेल्या पदाधिकार्यांनी माझे काम केले नाही, असा आरोप पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी यावेळी केला.