छत्रपती संभाजीनगर : दोन वर्षांपासून शिवसेना उबाठा पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू होते, परंतु आता शिंदेंच्या शिवसेनेलाही गळती लागली आहे. शिंदे सेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शिल्पाराणी वाडकर आणि पक्षाचे जिल्हा संघटक भरतसिंग राजपूत या दोन मोठ्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागताच शिंदेंच्या सेनेतील अंतर्गत खदखद बाहेर पडत आहे. गेल्या दोन वर्षांत शिंदे सेनेत मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झाली. परिणामी, जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थतेची भावना निर्माण झाली होती. या अस्वस्थतेतूनच आता शिंदे सेनेत राजीनामा सत्र सुरू झाल्याचे बोलले जात आहे. शिंदे सेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि विद्यमान जिल्हा संघटक भरतसिंग राजपूत यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. विधानसभेवेळी संजय जाधव यांना ऐनवेळी पक्षात घेऊन उमेदवारी दिली. त्यामुळे पक्षाचे तालुकाप्रमुख व अनेक पदाधिकारी दुखावले गेले. मी पक्षासोबत राहून जाधव यांना निवडून आणण्यामध्ये भूमिका निभावली. परंतु त्यानंतरही आमदारांच्या सांगण्यावरून मला विश्वासात न घेता माझी नियुक्ती जिल्हाप्रमुखपदावरून जिल्हा संघटक म्हणून करण्यात आली. त्यामुळे आपण राजीनामा देत आहोत, असे राजपूत यांनी म्हटले आहे. राजपूत यांनी मंगळवारी (दि.18) रोजी मुंबई येथे भाजपात प्रवेश केला. दुसरीकडे शिंदे सेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शिल्पाराणी वाडकर यांनीही पक्षाला जयमहाराष्ट्र केला आहे. त्यांनी आपला राजीनामा पक्षाच्या सचिवांकडे पाठवून दिला असून, त्यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. असे असले तरी पक्षांत डावलले जात असल्यानेच त्यांनीही राजीनामा दिल्याची चर्चा आहे.
यांचाही शिंदे सेनेला जय महाराष्ट्र
भरतसिंग राजपूत यांच्यासोबतच शिंदे सेनेच्या इतरही काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सभापती धनराज बेडवाल, उपतालुकाप्रमुख नितीन राठोड, साराळाचे माजी सरपंच राजू जंगले, आडगाव पिशोरचे माजी सरपंच किशोर केंदळे, जीवन भोसले, मोहराचे समाधान गाडेकर, औराळाचे विभागप्रमुख सुभाष रिडे पाटील आदींचा समावेश आहे.