Crime News Shepherds Attacked Women Children Assaulted
गंगापूर: गंगापूर तालुक्यातील मांजरी शिवारात मेंढ्या चारण्यासाठी थांबलेल्या मेंढपाळांवर सुमारे १५ अज्ञात दरोडेखोरांनी मध्यरात्री दोन च्या सुमारास हल्ला चढवून बेदम मारहाण केली. या हल्ल्यात चोरट्यांनी सुमारे ५ ते ६ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला असून महिलांसह लहान मुलांनाही मारहाण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महेश बाळासाहेब कसाने यांच्या गट क्रमांक २०० मधील शेतात काही मेंढपाळ कुटुंबीय मेंढ्या चारण्यासाठी थांबले होते. याच वेळी सुमारे १५ जणांच्या टोळीने अचानक हल्ला चढवून त्यांच्या जवळील १०० भार चांदीचे वाळे, २ ते ३ लाखांचे सोनं, मोबाईल फोन्स व रोख सुमारे २.५ लाख रुपये असा एकूण ५ ते ६ लाखांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून नेला.
या दरोड्यात भावसिंग विठोबा शिंगाडे (वय ६०), सुमनबाई शिंगाडे ( वय ४०), सीताराम शिंगाडे (वय ३०), आशाबाई शिंगाडे (वय ३५), मधु शिंदे, नानाबाई शिंदे, सुनील चौगुले, शंकर भडांगे, ताराचंद पवार, राधा शिंगाडे, ज्ञानेश्वर शिंगाडे, नानाबाई शिंगाडे (वय ३०, सर्वजण रा. सोमठाणा, ता. येवला, जि. नाशिक) जखमी झाले आहेत. या सर्वांना गंभीर मारहाण करण्यात आली आहे.
रात्रीच्या वेळी मांजरी येथील राहुल मिसाळ, ललित कसाने, मुकुंद मिसाळ, रामचंद्र मिसाळ आदींनी तातडीने जखमींना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून प्राथमिक उपचारानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. घटनेनंतर समस्त धनगर समाजाने तीव्र संताप व्यक्त करत दरोडेखोरांना तत्काळ अटक करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णपूर्णा सिंह, श्वान पथक, फिंगरप्रिंट तज्ज्ञ यांची भेट दिली. तपासासाठी विशेष पोलीस पथक रवाना करण्यात आल्याची माहिती अण्णपूर्णा सिंह यांनी दिली. पोलिसांकडून या गंभीर प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे.