ठेकेदारांच्या नफेखोरीने शेंद्रा एमआयडीसी कंपन्यांची वाट खडतर केली आहे. Pudhari News Network
छत्रपती संभाजीनगर

Shendra MIDC Road Condition : शेंद्रा एमआयडीसीत ठेकेदारांचा 'उद्योगधंदा'तेजीत

सहा महिन्यांत उरवडले रस्ते ठिकठिकाणी धूळधाण कारवाई ऐवजी प्रशासनाकडून अभय

पुढारी वृत्तसेवा

राहुल जांगडे, छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्याच्या औद्योगिक प्रगतीची नवी दारे खुली करणाऱ्या शेंद्रा एमआयडीसीत नवनवीन उद्योग यावे, यासाठी शासनाने रेडकारपेट अंथरले असताना दुसरीकडे इथे आहे त्या कंपन्यांची वाट ठेकेदारांच्या नफेखोरीने खडतर केली आहे. या एमआयडीसीमध्ये केलेले रस्ते काही महिन्यांतच उखडून गेले आहेत. जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्यांची अक्षरशः धूळधाण झाली आहे. त्यामुळे 'फाइव्ह स्टार नव्हे तर स्लम एमआयडीसी' असे चित्र आहे. गंभीर बाब म्हणजे, कारवाईची जबाबदारी असलेल्या एमआयडीसी प्रशासनाकडूनच ठेकेदारांना पोसण्याचे धंदे सुरू असल्याने उद्योगनगरीच्या भरभराटीला ब्रेक लागला आहे.

जालनारोडवरून शेंद्रा पंचतारांकित औद्यागिक क्षेत्राच्या प्रवेश मार्ग असलेल्या ए, ओ, पी, क्यु, आर.. या रस्त्यांचे काही महिन्यांपूर्वीच म्हणजे गतवर्षी डिसेंबरमध्ये रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्यात आले. कंत्राटदार मे. ब्रीकेष ग्रुपने या रस्त्याचे काम केले. यासाठी तब्बल ८ कोटी, ६७ लाख ९४ हजार १८९ रुपये घेतले. मात्र, काही महिन्यांतच हा प्रवेश मार्ग उखडून गेला आहे. जागोजागी खड्डे पडले असून, ए पाइंटपासून वीज कंपनीचे उपकेंद्र ते प्रीमियम कंपनीपर्यंत या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे.

डी ब्लॉक मधील रस्त्याचं झालेली दुरवस्था.

पॅचवर्कनंतरही खराब रस्ता आणि खड्ड्यांमुळे मोठ्या वाहन चालकांना गचके बसत आहेत. तर उखडलेली खडी रस्त्यावर पसरल्याने दुचाकीस्वार घसरून लहान-मोठे अपघात होत आहेत. येथील रेडिको कंपनीसमोरील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. डी ब्लॉकमधील या रस्त्याचे डांबरीकरण ७ कोटी, ४५ लाख ११ हजार ४०९ रुपयांच्या निधीतून झालेले आहे. सद्यस्थितीत हा संपूर्ण रस्ताच जमिनीत रुतल्याने ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. दर्जाहीन कामांमध्ये येथील रस्त्यांचा अक्षरशः धुरळा झाला आहे. अशीच अवस्था एमआयडीसीमधील अनेक रस्त्यांची झालेली आहे. जागोजागी पडलेले खड्डे, रस्त्याच्या चाळणीमुळे खडी पसरल्याने एमआयडीसीची वाटच खडतर झाली आहे.

रेडिको कंपनीसमोरील डांबरी रस्ता उखडून पडलेला मोठा खड्डा...

काय म्हणतात एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आर. गिरी

  • प्रश्न : शेंद्रा एमआयडीसीच्या प्रवेश-व्दाराचा रस्ता काही महिन्यांतच उखडला ?

  • अभियंता आर. गिरी: होय, कंत्राटदार ऋषिकेष ग्रुपला नोटीस दिली आहे. तो रस्ता नव्याने करून घेणार आहे.

  • प्रश्न : रस्त्यांवर खड्डे पडून अक्षरशः चाळणी झाली, याला जबाबदार कोण ?

  • अभियंता आर. गिरी : कंत्राटदाराकडून खड्डे भरून घेतले आहेत.

  • प्रश्न : रेडीको कंपनीसमोरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे?

  • अभियंता आर. गिरी : यांसह इतर रस्त्यांची उपअभियंता पाहणी करून आढावा घेतील, त्या एजन्सींवर कारवाई करू.

शेंद्रा एमआयडीसी प्रवेश मार्गाची अशी चाळणी झाली आहे.

कामांच्या गुणवत्तेवर शंका

नव्याने केलेले डांबरी रस्ते काही महिन्यांतच उखडून गेले आहेत. पॅचवर्कची कामेही थातूर-मातूर झाल्याने रस्त्यांवर खडीचा अक्षरशः खच पडला आहे. निकृष्ट रस्ते झाल्याने ठेकेदारांनी केलेल्या कामांच्या गुणवत्तेवर शंका उपस्थित केल्या जात आहेत.

शेंद्रा एमआयडीसीमध्ये ठेकेदारांनी केलेल्या निकृष्ट कामांमुळे रस्त्यांची अशी गंभीर दुरवस्था झालेली आहे.

रस्त्यांची दुरवस्था बनली गंभीर समस्या

शेंद्रा औद्योगिक क्षेत्रातील काही प्रमुख मार्गांसह अनेक अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. या पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील खड्डेमय आणि चाळणी झालेले रस्त ही एक गंभीर समस्या बनली आहे. यामुळे येथील उद्योजकांनाच नव्हे तर येणारे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे.

औद्योगिक विकासाला खीळ

शेंद्रा एमआयडीसीत अनेक नामांकित कंपन्या आहेत. अनेक कंपन्या उद्योगासाठी इच्छुक आहेत. मात्र, येथील खराब रस्ते, अपुरे रुंदीकरण आणि अपुऱ्या सुविधांमुळे काही उद्योजकांचे पथकही माघारी फिरले होते. तसेच या भागातील औद्योगिक विकासाला खीळ बसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT