छत्रपती संभाजीनगर : शेंद्रा-बिडकीन ऑरिक सिटीतील उद्योगांची दळणवळण सुविधा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी 'शेंद्रा-बिडकीन ते ढोरेगाव' या इंडस्ट्रियल ग्रीन फील्ड महामार्गासाठी जुन्या-नव्या गटांतील जमीन मोजणी पूर्ण झाली आहे. आता १ डिसेंबरनंतर अंतिम अधिसूचना जारी करून महिनाभरात भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे.
राज्य शासनाकडून मराठवाड्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहे. त्यांतर्गत शेंद्रा-बिडकीन ऑरिक सिटी पुणे, मुंबईतील औद्योगिक वसाहतींशी सुपरफास्ट कनेक्ट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करमाड-बिडकीन, ढोरेगाव या ग्रीन फील्डच्या कामाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या मार्गासाठी आवश्यक सर्व परवानग्यांना तातडीने मंजुरी दिली जात आहे.
केंद्राच्या पर्यावरण मंत्रालयाने देखील अगदी दीड ते दोन महिन्यातच परवानगी दिली आहे. तातडीने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यासोबतच आता भूसंपादनापूर्वीची जमीन मोजणी प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, पैठण आणि गंगापूर या तीन तालुक्यांतील ५२ गावांतून हा मार्ग जात आहे.
त्यामुळे शासनाने या तिन्ही तालुक्यांसाठी भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे, संभाजीनगरचे उपविभागीय अधिकारी वेंकट राठोड, पैठण फुलंब्रीच्या उपविभागीय अधिकारी निलम बाफना यांची भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्त केली होती. त्यानुसार या अधिकाऱ्यांनी प्रक्रिया सुरू करीत जमीन मोजणी पूर्ण केली आहे. आता १ डिसेंबरला अंतिम अधिसूचना जारी होणार आहे.
१२० मीटर रुंदीचा मार्ग
'शेंद्रा-बिडकीन ते ढोरेगाव' हा ३५ किलो मीटर लांबीचा इंडस्ट्रियल ग्रीन फील्ड महामार्ग १२० मीटर रुंदीचा राहणार आहे. त्यामुळे उद्योगनगरीसाठी जलदगती मार्ग ठरेल, अशी माहिती प्रशासकीय यंत्रणांकडून देण्यात येत आहे.
नववर्षात सुरू होणार प्रत्यक्ष काम
जुन्या आणि नव्या गटांची मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या १ डिसेंबरनंतर अधिसूचना जारी केली करून त्यासोबतच दाखल आक्षेप सुनावणी घेऊन भूसंपादन अवॉर्ड जाहीर केले जाईल. त्यामुळे नववर्षातच या मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
ग्रीन फिल्ड मार्गाच्या मोजणीनंतर आता १ डिसेंबरला अंतिम अधिसूचना जारी करणार आहे. त्यानंतर हरकती व सूचनां व सुनावणी प्रक्रिया महिनाभरात आटोपून भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात येईल.एकनाथ बंगाळे, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन विभाग