Seventy rickshaws decorated with Manoj Jarange's stickers with slogans like 'Chalo Mumbai'
शुभम चव्हाण
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
'आमचं काय साहेब, हातावर पोट. पण आमच्या लेकरांनीही भविष्यात रिक्षाच चालवायच्या का? म्हणून आम्ही जरांगे पाटील यांच्या हाकेला साथ दिली आणि मुंबईची वाट धरली आहे..' अशा भावना मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या महामोर्चात सहभागी झालेल्या ७० रिक्षाचालकांनी व्यक्त केल्या.
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या मराठा आरक्षण महामोर्चाला समाजबांधवांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी ही निर्णायक लढाई असल्याचा संदेश जरांगे पाटलांनी दिल्यानंतर गावोगावी व शहरात मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने मुंबईकडे निघाले आहेत.
मोर्चात लहान मुलांपासून ते वयोवृद्ध नागरिकांचा समावेश असल्याने तो चर्चेचा विषय ठरत आहे. यासोबतच मोर्चात सहभागी झालेले नारायणगाव व चाकण परिसरातील ७० रिक्षाचालक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. आपल्या रिक्षांवर 'चलो मुंबई' अशा घोषवाक्यांसह जरांगे पाटलांचे फोटो चिकटवून त्यांनी तिन्ही बाजूंनी रिक्षा सजवल्या आहेत.
रिक्षाचालकांच्या मते, रोज कमावणं आणि खाणं अशीच आमची घरची परिस्थिती आहे. आमचं आयुष्य संघर्षात गेलं, पण आमच्या लेकरांनीही भविष्यात संघर्ष करायचा का? म्हणून आम्ही मुंबईची वाट धरली असून आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान मोर्चात रस्त्याच्या कडेला उभे राहून लोक पुष्पवृष्टी करत आहेत, फटाक्यांची आतषबाजी करत आहेत. एरवी रिक्षा चालवताना लोक आम्हाला चांगली वागणूक देत नाहीत. मात्र जरांगे पाटलांमुळे मिळालेल्या या मानामुळे आम्ही भावनिक झालो आहोत, अश्याही भावना रिक्षाचालकांनी व्यक्त केल्या.