Second phase of the hearing on the corporator disqualification case today
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महानगरपालिकेतील नगरसेवक अपात्रतेसाठी दाखल करण्यात आलेल्या तक्रारींच्या सुनावणीच्या दुसऱ्या टप्प्याला आज, सोमवारी (दि. २८) सुरुवात होत आहे. पहिल्या टप्प्यातील सुनावणीत मुदत मागणाऱ्या भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि एमआयएमच्या नऊ नगरसेवकांची आज दुपारी ३ वाजता महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण शहराच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या एकूण ११५ नगरसेवकांपैकी तब्बल २५ नगरसेवकांविरोधात विविध कारणांवरून अपात्रतेच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. दोनपेक्षा अधिक अपत्ये असणे, स्वतःचे अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकाम असणे, तसेच अतिक्रमणाला प्रोत्साहन देणे यांसारख्या गंभीर कारणांवरून त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे. या अनुषंगाने प्रशासनाने संबंधित नगरसेवकांना नोटिसा बजावल्या असून, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १० (१) (ड) नुसार आयुक्त अमोल येडगे यांच्यासमोर ही सुनावणी प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात एकूण ३८ तक्रारी दाखल झाल्या असून, त्यापैकी २७ तक्रारींवर पहिल्या टप्प्यात सुनावणी पार पडली आहे.
मुदत मागणाऱ्या ९ नगरसेवकांची आज सुनावणी
गेल्या १७ ऑगस्ट रोजी झालेल्या पहिल्या टप्प्यातील सुनावणीवेळी या नऊ नगरसेवकांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी प्रशासनाकडे अधिक वेळेची मागणी केली होती. आयुक्तांनी त्यांची ही विनंती मान्य करून पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली होती. त्यानुसार आज दुपारी ३ वाजता महापालिकेच्या प्रशासकीय सभागृहात या नऊ जणांची सुनावणी घेतली जाणार आहे. या सर्व संबंधित नगरसेवकांना आपली बाजू लेखी स्वरूपात मांडण्यासोबतच, त्यासंदर्भातील आवश्यक कागदपत्रे आणि भक्कम पुरावे सादर करण्याचे स्पष्ट निर्देश नोटिसीद्वारे देण्यात आले आहेत.
पुढील सुनावणीचे वेळापत्रक निश्चित
दरम्यान, या अपात्रता प्रकरणांच्या सुनावणीच्या पुढील फेऱ्यांचे वेळापत्रकही प्रशासनाकडून निश्चित करण्यात आले आहे. ज्या प्रकरणांची सुनावणी २४ ऑगस्ट रोजी झाली होती, त्यांची पुढील सुनावणी ५ ऑक्टोबरला होणार आहे. तर, ७ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीतील प्रकरणांची पुढील सुनावणी १२ ऑक्टोबरला घेतली जाणार आहे. यामुळे अपात्रता तक्रारींवरील सुनावणीची प्रक्रिया आता एका निश्चित वेळापत्रकानुसार पुढे सरकत आहे.