Accident News : शाळकरी मुलाला उडवून स्कार्पिओचालक पसार (File Photo)
छत्रपती संभाजीनगर

Accident News : शाळकरी मुलाला उडवून स्कार्पिओचालक पसार

पवननगर येथील घटना ; मुलगा गंभीर जखमी ; सिडको पोलिसांत गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Scorpio driver flees after hitting schoolboy

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सायकलवरून ट्यूशनला जाणाऱ्या एका १४ वर्षीय शाळकरी मुलाला भरधाव स्कार्पिओने पाठीमागून जोराची धडक दिली. ही घटना ८ जुलैला दुपारी अडीचच्या सुमारास पवननगर येथील रंजनवन सोसायटीसमोर घडली. या अपघातात मुलाचा गुडघा फॅक्चर झाला असून त्याच्या गुप्तांगाला जबर मार लागल्याने गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्कार्पिओ चालक गाडीसह पसार झाला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अज्ञात स्कार्पिओ चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश जनार्दन हरणे (वय १४, रा. पवननगर, एन-९, हडको) असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.

गणेश हा नववीत शिकत असून तो किक बॉक्सिंगचा नॅशनल खेळाडू आणि कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट आहे. गणेशची आई रेखा (५४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी (८ जुलै) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गणेश हा त्याच्या मित्रासोबत सायकलवरून ट्यूशनला जात होता. रंजनवन सोसायटीच्या समोरील रस्त्यावरून जात असताना, पाठीमागून वेगात आलेल्या एका काळ्या रंगाच्या स्कार्पिओने त्याच्या सायकलला उजव्या बाजूने जोराची धडक दिली आणि गाडी न थांबवता चालक वेगात निघून गेला. या धडकेमुळे गणेश सायकलसह रस्त्यावर जोरात आदळला. यात त्याच्या गुडघ्याला, हाताला, पोटाला आणि अवघड जागेवर गंभीर दुखापत झाली.

जखमी अवस्थेतच गणेश ट्यूशनवरून संध्याकाळी ५.३० वाजता घरी परतला आणि त्याने आईला अपघाताची माहिती दिली. आईने त्याला तातडीने उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात नेले. मात्र, त्रास वाढत गेल्याने त्याला रविवारी (१२ जुलै) मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी त्याला तपासून 'पीआयसीयू'मध्ये दाखल केले. गणेशचा गुडघा फॅक्चर झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार भारती माळुकर (गायकवाड) करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT